नगरसेवकांना किती मिळते मानधन; बैठक भत्ता, प्रवास भत्ता व इतर सुविधा काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 18:49 IST2026-01-13T18:29:24+5:302026-01-13T18:49:48+5:30

Chandrapur : महानगर पालिकेतील ६६ नगरसेवक पदांसाठी तब्बल ४५१ उमेदवार रिंगणात आहेत. प्रचारासाठी उमेदवारांकडून लाखो रूपये खर्च केले जात असल्याची चर्चा आहे. लाखोंची उधळण करून नगरसेवक झाल्यानंतर त्यांना नेमके मानधन किती मिळते, हा विषय सध्या नागरिकांमध्ये चर्चेचा झाला आहे.

लोकप्रतिनिधींना वेतन नव्हे, मानधन - महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम ६१ (१) च्या तरतुदीनुसार राज्यातील नगराध्यक्ष व नगरसेवकांना दरमहा मानधन व दरवर्षी अतिथ्य भत्ता देण्यास मान्यता आहे. सरकारने निश्चित मानधन सुरू करण्याची नगरसेवकांची मागणी आहे.

मनपा श्रेणीनुसार मानधन - महापालिकांना अ, ब, क, ड श्रेणीनुसार नगरसेवकांना मानधन दिले जाते. मनपा अ प्लस वर्ग-२५ हजार रुपये, अ श्रेणीत २० हजार रुपये, ब. १५ हजार रुपये, क साठी १० हजार रुपये ड साठी ७ हजार ५०० रूपये मानधन दिले जाते.

बैठक भत्ता, प्रवास भत्ता व इतर सुविधा काय - नगरसेवकांना महासभा, स्थायी समिती सभा व अन्य विषय समिती बैठकीचा ४०० रुपये भत्ता मिळतो. महापौर, उपमहापौर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना स्वतंत्र कैबिन, वाहन, मोबाइल सीमकार्ड, लेटरहेडची पुस्तके दिली जातात.

विविध समित्यांवर लागते वर्णी - नगरसेवकांची स्थायी, परिवहन, शिक्षण, महिला व बालकल्याण, अशा समित्यांवर वर्णी लागते. विरोधी पक्षनेता, गटनेता यांचीही निवड होते. ही पदे मनपात मानाची मानली जातात.

वॉर्ड विकास निधी कुणाला किती - स्वनिधी वाटप करण्याचे अधिकार महासभेला आहेत. महासभेने जर महापौरांच्या नेतृत्वात समितीला अधिकार दिल्यास ही समिती निर्णय घेते. प्रत्येक नगरसेवकाला ५ लाखांपासून १० लाखांपर्यंतचे ऐच्छिक बजेट दिले होते. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापतींना विशेष बाब म्हणून जादा बजेट मिळते.