Income Tax: १२ लाख नाही १२.७५ लाख म्हणा...! पगारदारांची बल्लेबल्ले, इन हँड सॅलरीही वाढणार; सगळं काही एकाच खटक्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 14:10 IST2025-02-01T14:03:57+5:302025-02-01T14:10:32+5:30

Budget For Salaried Persons, Income Tax Slab Change: निर्मला सीतारामण यांनी इमाने इतबारे कर भरणाऱ्या पगारदार वर्गाला एकाच खटक्यात मालामाल होण्याची संधी दिली आहे.

पगारदारांनी कधी विचारही केला नव्हता अशी लॉटरी आजच्या अर्थसंकल्पात लागली आहे. सोशल मीडियावर नेहमी ट्रोल होणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर आज अचानक कौतुकाचा पाऊस पडू लागला आहे. हे लोक असेच करत नाहीएत. तर अर्थमंत्र्यांनी नोकरदार वर्गाला १२.७५ लाख रुपयांची करमाफी केलीच आहे, परंतू त्यांची इन हँड सॅलरी देखील वाढविली आहे. इमाने इतबारे कर भरणारा हा नोकरदार वर्ग दोन दोन हातांनी पैसा घेऊन घरी जाणार आहे.

नोकरदार वर्गाकडे कर चुकविण्याच्या पळवाटा फार कमी होत्या. जेवढा पगार मिळतो, तेवढा एकतर त्याला नाहीतर त्याच्या कंपनीला दाखवावाच लागत होता. कंपनी तर दर महिन्याच्या पगारातून टीडीएसच कापायची. आर्थिक वर्षाच्या अखेरीस तर याला जोर यायचा. यामुळे हा नोकरदार वर्ग पूर्ण पगार कधीच घरी घेऊन जाऊ शकत नव्हता. आता निर्मला सीतारामण यांनी या इमाने इतबारे कर भरणाऱ्या पगारदार वर्गाला एकाच खटक्यात मालामाल होण्याची संधी दिली आहे.

टीसीएस यापुढे पॅन नसलेल्यांनाच लागू होणार आहे. तर पगारावरील टीडीएस देखील कमी करण्यात आला आहे. यानुसार आता १ लाख रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन करण्यात येणार आहे. भाड्यावर मिळणारी सूट देखील आता २.५ लाख रुपयांवरून ६ लाख रुपये करण्यात आली आहे.

नवीन रिजीमी निवडल्यानंतर १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी हे ७ लाख रुपये होते. तसेच यात 75000 रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन होते. ते तेवढेच ठेवण्यात आले आहे. म्हणजेच नवीन कर प्रणालीनुसार नोकरदार वर्ग २०२४-२५ साठी ७.७५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करू शकत होता. ते आता १२.७५ लाख रुपये झाले आहे.

टीडीएस कमी केल्याने नोकरदार वर्गाच्या इन हँड सॅलरीमध्ये वाढ होणार आहे. आता हे सर्व फायदे घ्यायचे असतील तर तुम्हाला ओल्ड टॅक्स रिजिमीमध्ये अडकून पडण्याऐवजी न्यू टॅक्स रिजिमीकडे वळावे लागणार आहे.

आता बऱ्याच करदात्यांना जुन्या कर प्रणालीवरून नवीन कर प्रणालीकडे जाण्यासाठी भाग पाडले जाणार आहे. जुन्या कर प्रणालीतील करदात्यांना कोणताही सूट देण्यात आलेली नाही. त्यांच्या टॅक्स स्लॅबमध्ये देखील कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

महागाई वाढलेली आहे, यामुळे अनेकजण पगारवाढीच्या प्रतिक्षेत आहेत. आहे तो पगार पुरत नसल्याने नोकरी देखील बदलण्याच्या प्रतिक्षेत आहेत. अशा लोकांना भविष्यात वाढलेल्या पगारावर फायदा मिळणार आहे. ज्यांचा पगार ८-१० लाख रुपये दर वर्षाला होता, ते आता १२-१३ लाखांच्या पॅकेजमध्ये जरी गेले तरी देखील त्यांना कोणताही कर द्यावा लागणार नाहीय.