सिगारेटपासून ते FASTag पर्यंत, १ फेब्रुवारीपासून बदलणार 'या' वस्तूंच्या किमती; खिशावर थेट होणार परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 10:07 IST2026-01-31T09:52:40+5:302026-01-31T10:07:58+5:30
Rule change February 2026: १ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या बदलांचा परिणाम थेट सामान्य माणसाच्या खिशावर, खर्चावर आणि नियोजनावर होईल. बजेट, कर, गॅस, गुंतवणूक आणि सरकारी योजना प्रत्येक आघाडीवर काहीतरी नवीन दिसेल.

New Rules From 1 February 2026: उद्या, १ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. या बजेटमधील घोषणांसोबतच १ फेब्रुवारीपासून अनेक नियम आणि वस्तूंच्या किमती बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर आणि खिशावर होईल. यामध्ये एलपीजी सिलिंडर, फास्टॅग आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांचा समावेश आहे.

१. एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला इंधन कंपन्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरांचे पुनरावलोकन करतात. त्यानुसार उद्या १ फेब्रुवारीला एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमती वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात. गेल्या महिन्याचा कल पाहता १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १४.५० रुपयांची कपात करण्यात आली होती.

२. सीएनजी, पीएनजी आणि विमान इंधन
बजेटच्या दिवशीच सीएनजी (CNG), पीएनजी (PNG) आणि विमानांच्या इंधनाच्या किमतींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. जर सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढले, तर तुमचा प्रवासाचा खर्च आणि घराचं बजेट बिघडू शकतं. तसंच विमान इंधनाच्या दरातील बदलामुळे विमान प्रवास स्वस्त किंवा महाग होऊ शकतो.

३. फास्टॅग नियमात बदल
नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI) मोठी घोषणा केली आहे की, १ फेब्रुवारीपासून फास्टॅगसाठी स्वतंत्र केवायसी (KYC) पडताळणीची प्रक्रिया पूर्णपणे बंद केली जाईल. आता फास्टॅग जारी करणाऱ्या बँकांची ही जबाबदारी असेल की त्यांनी वाहन संबंधित सर्व तपासणी आधीच पूर्ण करावी. युजर्सना फास्टॅग अॅक्टिव्ह केल्यानंतर अतिरिक्त केवायसी करण्याची गरज भासणार नाही.

४. सिगरेट, पान मसाला आणि तंबाखू महागणार
१ फेब्रुवारी २०२६ पासून पान मसाला, सिगरेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन महागात पडणार आहे. सरकार या उत्पादनांवर उत्पादन शुल्क (Excise Duty) आणि उपकर (Cess) वाढवण्याच्या तयारीत आहे. हा अतिरिक्त कर सामान्य जीएसटीपेक्षा वेगळा असेल, ज्यामुळे या वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ होणं निश्चित आहे.

५. क्रेडिट कार्डच्या नियमात बदल
एचडीएफसी (HDFC) आणि आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या क्रेडिट कार्ड नियमांमध्ये १ फेब्रुवारीपासून बदल होत आहेत. एचडीएफसी 'इन्फिनिया मेटल' कार्ड युजर्स आता महिन्यातून जास्तीत जास्त पाच वेळाच रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करू शकतील. तर, आयसीआयसीआय बँक आपल्या काही खास क्रेडिट कार्ड्सवर 'बुकमायशो'द्वारे मिळणारी मोफत मुव्ही तिकीट सुविधा बंद करत आहे. तसंच रिवॉर्ड पॉइंट्सच्या रचनेतही बदल होणार आहेत.


















