Budget 2022: बजेटशी संबंधित 'या' खास गोष्टी, कदाचित तुम्हाला माहीत नसतील, जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 02:48 PM2022-01-14T14:48:32+5:302022-01-14T15:18:47+5:30

Budget 2022 : यंदाचे बजेट लोकाभिमुख असेल, अशी अपेक्षा सर्वांनाच आहे.

कोरोना महामारीचा सामना करत असलेली देशातील जनता सर्वसाधारण अर्थसंकल्पाची (बजेट) आतुरतेने वाट पाहत आहे. यंदाचे बजेट लोकाभिमुख असेल, अशी अपेक्षा सर्वांनाच आहे. मात्र, 1 फेब्रुवारी 2022 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2022-23 चे बजेट सकाळी 11 वाजता सादर करतील, तेव्हाच यावर पडदा पडेल. आज आम्ही तुम्हाला बजेटच्या इतिहासाशी संबंधित काही गोष्टी सांगत आहोत, ज्या जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

बजेट हा शब्द फ्रेंच भाषेतील बुल्गा या लॅटिन शब्दापासून बनला आहे, ज्याचा अर्थ चामड्याची पिशवी. बुग्लापासून फ्रेंच शब्द बोऊगेट अस्तित्वात आला. यानंतर बोगेट हा इंग्रजी शब्द अस्तित्वात आला आणि या शब्दापासून बजेट शब्द उदयास आला. त्यामुळेच आधी बजेट चामड्याच्या पिशवीत आणले जात होते.

बजेट खरंतर सरकारने दिलेल्या वर्षातील देशाच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा लेखाजोखा असतो. याची सुरुवात ब्रिटनने केली होती. ब्रिटीशांच्या काळात भारतात पहिल्यांदा 7 एप्रिल 1860 रोजी बजेट सादर करण्यात आले. हे बजेट ब्रिटिश सरकारमधील अर्थमंत्री जेम्स विल्सन यांनी मांडले होते.

स्वातंत्र्य भारताचे पहिले केंद्रीय बजेट कधी सादर झाले? हा प्रश्न जवळपास सर्वांच्याच मनात आहे. तर आपण जाणून घेऊया की, भारताचे पहिले अर्थमंत्री आर के षण्मुखम चेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी पहिले बजेट सादर केले होते. दरम्यान, चेट्टीचा जन्म 1892 मध्ये झाला होता. ते वकील, राजकारणी आणि अर्थतज्ज्ञ होते.

देशाचे बजेट नेहमीच अर्थमंत्र्यांकडून सादर केले जाते, परंतु भारताच्या इतिहासात असे तीन प्रसंग आले आहेत, जेव्हा पंतप्रधानांनी सर्वसाधारण बजेट सादर केले आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे भारताचे बजेट सादर करणारे सर्वोच्च पदावर बसणारे पहिले व्यक्ती होते. त्यांनी प्रथम 13 फेब्रुवारी 1958 रोजी अर्थखाते सांभाळले आणि बजेट सादर केले. याशिवाय इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनीही पंतप्रधान असताना बजेट सादर केले होते.

केसी नियोगी हे भारताचे एकमेव अर्थमंत्री होते, ज्यांनी या पदावर असतानाही एकही बजेट सादर केले नाही. दरम्यान, 1948 मध्ये ते 35 दिवस अर्थमंत्री होते. भारतीय प्रजासत्ताक स्थापनेनंतरचा पहिला अर्थसंकल्प 28 फेब्रुवारी 1950 रोजी जान मथाई यांनी सादर केला होता.

बजेट नेहमी सकाळी 11 वाजता सादर केले जाते. दरम्यान, असे पहिल्यापासून होत नाही. याआधी ब्रिटीश काळात संध्याकाळी 5 वाजता बजेट मांडले जायचे, जेणेकरून रात्रभर बजेटवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना थोडी विश्रांती मिळावी. इतकेच नाही तर 1955 पर्यंत बजेट केवळ इंग्रजीत प्रकाशित होत होते. मात्र 1955-56 पासून सरकारने ते हिंदीतही प्रकाशित करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, हलवा कार्यक्रमामागे अशी धारणा आहे की प्रत्येक शुभ कार्य करण्यापूर्वी काहीतरी गोड खावे. त्यामुळे बजेटसारख्या मोठ्या कार्यक्रमापूर्वी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या परंपरेनुसार विद्यमान अर्थमंत्री स्वत: अर्थसंकल्पीय कर्मचारी आणि वित्त अधिकाऱ्यांना हलवा वाटप करतात.

ब्रिटिशांच्या काळात जेव्हा अर्थमंत्री संसदेत सरकारच्या खर्चाची आणि उत्पन्नाची माहिती देत ​​असत आणि ती लाल चामड्याच्या बॅगेत आणली जायची. हे त्याच्या नावाशी संबंधित घटकांमुळे होते आणि ही परंपरा सतत चालू राहिली. मात्र भाजपा सरकारने लाल बॅगची परंपरा संपवली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चामड्याच्या ब्रीफकेसऐवजी 2019 मध्ये बजेट दस्तऐवज वही-खात्यामध्ये (पारंपारिक लाल कपड्यात गुंडाळलेला कागद) नेण्याची प्रथा सुरू केली.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या स्वतंत्र भारताचे बजेट सादर करणाऱ्या पहिल्या महिला होत्या. पंतप्रधान असताना त्यांनी अर्थखातेही हाताळले आणि बजेटही सादर केले होते. यानंतर, 5 जुलै 2019 रोजी, निर्मला सीतारामन या देशाचे बजेट सादर करणाऱ्या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री बनल्या. म्हणजे निर्मला सीतारामन यांच्या आधी अशी एकही महिला नव्हती जी फक्त अर्थमंत्री होती.