Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 17:35 IST2025-08-25T17:30:58+5:302025-08-25T17:35:23+5:30

Hartalika Teej Vrat 2025: यंदा २६ ऑगस्ट रोजी हरितालिका (Haritalika teej 2025) आणि २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2025) आहे. हरितालिका हे व्रत कुमारिका, सवाष्ण आणि विधवा स्त्रियादेखील करू शकतात, हे या व्रताचे वैशिष्ट्य आहे. कारण हे व्रत केवळ मनासारखा पती मिळावा म्हणून नाही, तर खडतर तपश्चर्येने कोणतीही असाध्य गोष्ट साध्य होऊ शकते, याची जाणीव करून देणारे व्रत आहे. प्रख्यात निवेदिका आणि संस्कृत अभ्यासक धनश्री लेले यांनी या व्रताकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन दिला. त्या म्हणतात-

आदर्श कुटुंब व्यवस्थेचे उदाहण : - Marathi News | Hartalika Teej Vrat Mahiti in Marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

पार्वती ही हिमालयाची कन्या. स्वत: सुखवस्तू कुटुंबातली मुलगी. ती उपवर होताच तिच्यासाठी वैभवसंपन्न अशा भगवान विष्णूंचे स्थळ चालून आले. परंतु पार्वतीने शंकराशी विवाह करण्याचा मनोमन निश्चय केला होता. आई-वडिलांनी तिची समजूत काढली, परंतु आपले मत तिच्यावर लादले नाही तर तिच्या मताचा आदर करत तिचे लग्न शंकराशी लावून दिले. अर्थात पार्वतीने हा निर्णय डोळे झाकून घेतलेला नव्हता. पुढच्या बिकट परिस्थितीची तिला जाणीव होती. परंतु शंकर आपल्यासाठी योग्य वर आहेत याचा सारासार विचार करून तिने हा निर्णय घेतला आणि भगवान शंकराला मिळवण्यासाठी उग्र तपश्चर्या केली. भगवान प्रसन्न झाल्यावर हिमालयाने स्वत: तिचा आणि शंकराचा विवाह लावून दिला. या कथेतून आदर्श कुटुंब व्यवस्थेचे दर्शन घडते.

तपश्चर्येचे महत्त्व : - Marathi News | Hartalika Teej Vrat Benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

कोणतीही गोष्ट मिळवायची, तर तपश्चर्या करावी लागतेच. भगवान शंकराला मिळवणे सहज शक्य नाही, हे जाणून पार्वतीने उग्र तपश्चर्या केली. काहीही न खाता, पिता उपास आणि उपासना केली. पार्वती दिसायला सुंदर होती. परंतु भगवान शंकर सौंदर्याला भुलणारे नव्हते. त्यांनी मदनाला जाळून टाकले होते. जे मदनाला भुलले नाहीत, त्या शंकराला पार्वतीने तपाने भुलवले. त्याचप्रमाणे आपणही आपल्या जीवनातले कोणतेही ध्येय तपश्चर्येच्या बळावर मिळवू शकतो, हे पार्वती मातेने सिद्ध केले. तिच्या उग्र तपाचरणाची थोडीतरी कल्पना यावी आणि आपणही त्यातून प्रेरणा घ्यावी, यासाठी हरतालिकेचा निर्जळी उपास करतात.

आई वडिलांना मान्य नसतानाही पार्वती आपल्या मतावर ठाम होती. तिचा निग्रह पाहून तिच्या सख्यांनी तिला पाठबळ दिले आणि त्यासुद्धा तिच्यासाठी रानीवनी राहिल्या. तिच्या तपश्चर्येचा एक भाग झाल्या. म्हणून हरितालिकेच्या दिवशी शंकर पार्वतीबरोबरच सख्यांचीही पूजा केली जाते. मैत्रीचे दृढ नाते असावे, तर असे. आपणही आपल्या मैत्रिणीच्या योग्य निर्णयात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून वेळोवेळी प्रोत्साहन दिले पाहिजे, हा संदेशही यातून मिळतो.

पार्वतीने ही तपश्चर्या झाडांची पाने खाऊन केली होती. परंतु शंकर प्रसन्न होत नाहीत पाहून तिने पानांचाही त्याग केला, म्हणून तिला अपर्णा अशी ओळख मिळाली. तिने सोळा प्रकारच्या औषधी, गुणकारी, प्रसन्न करणाऱ्या पत्री शंकराला अर्पण केल्या. याचाच अर्थ हा केवळ पूजेच्या उपचाराचा भाग नव्हता, तर पार्वतीला वनस्पतींची माहिती होती. तिने केवळ पत्री तोडली नाही, तर या तपश्चर्येच्या काळात विविध प्रकारच्या झाडांची लागवड आणि संवर्धनही केले. त्याचप्रमाणे आपणही केवळ पूजेचा एक भाग म्हणून पत्री विकत न आणता त्या झाडांची, पानांची, फुला फळांची माहिती करून घ्यावी. म्हणजेच निसर्गाशी नाते जोडावे आणि त्याचे जतन-संवर्धन करावे, हा सुंदर विचार यातून मिळतो.

हिंदू सणवाराला जागरणाची जोड दिलेली आढळते. जागरण म्हणजे केवळ न झोपणे, असा त्याचा अर्थ नाही, तर जागे होणे हा अर्थ अभिप्रेत आहे. आपल्या कामांप्रती, ध्येयाप्रती, निश्चयाप्रती जागे होणे आणि जागृत राहून काम करणे, ही जाणीव या व्रत वैकल्यांच्या माध्यमातून देण्याची व्यवस्था धर्मशास्त्राने केली आहे. असा हा सण, व्रत, परंपरांमध्ये दडलेला सुंदर गर्भितार्थ लक्षात घेतला, तर जुन्या जाणकारांचा आणि आपल्या संस्कृतीचा आपल्यला निश्चित हेवा वाटेल.