Ganesh Festival 2021: गणपती पूजन दुर्वांशिवाय अपूर्ण का मानले जाते? जाणून घ्या कथा, मान्यता आणि दुर्वामहात्म्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 03:09 PM2021-09-07T15:09:08+5:302021-09-07T15:14:47+5:30

Ganesh Festival 2021: दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती पूजनाचे पुण्य प्राप्त होत नाही, असे सांगितले जाते. दुर्वा गणेश पूजनात एवढी का महत्त्वाची आहे? जाणून घ्या...

भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती स्मरण वा गणपती पूजनाने केली जाते. गणेश चतुर्थीचा उत्सव संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. माघ महिन्यातील गणेश जयंतीनंतर भाद्रपद चतुर्थीला महादेव शिवशंकरांनी सर्वप्रथम गणेशोत्सव साजरा केला, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

वास्तविक पाहता प्रत्येक महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षातील चतुर्थीला गणेश पूजनाची परंपरा आहे. मात्र, अनेकार्थाने भाद्रपदातील चतुर्थी महत्त्वाची मानली जाते. यंदाच्या वर्षी शुक्रवार, १० सप्टेंबरपासून गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. कोरोनामुळे काही निर्बंध असले, तरी उत्साह मात्र तेवढाच असणार आहे. (Ganesh Utsav 2021)

एका मान्यतेनुसार, श्रीगणेशाच्या अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला. श्रीगणेशाने सिंदूर दैत्यावर विजय मिळवला, तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी हाच होता. त्याप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करण्यात आला, अशी एक मान्यता आहे. महादेव शिवशंकरांच्या पूजेत बेलाच्या पानाला महत्त्व आहे; श्रीविष्णूंच्या पूजेत तुळशीच्या पानांना महत्त्व आहे; त्याचप्रमाणे गणपती पूजनात दुर्वांना अत्याधिक महत्त्व आहे. (why durva is most favorite of lord ganesha)

गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय असण्यामागे एक कथा सांगितली जाते. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती पूजन पूर्ण होत नाही. पूजेचे पुण्य प्राप्त होत नाही, असे सांगितले जाते. दुर्वा पूजनात एवढी का महत्त्वाची आहे? जाणून घेऊया...

गणपतीचे पूजन करताना २१ दुर्वांच्या २१ जुड्या किंवा त्याचा हार गणपतीला अर्पण करावा. एका मान्यतेनुसार, विषम संख्येत गणपतीला दुर्वा वाहव्यात. जसे की, ३, ५, ७, ९ अशा दुर्वांची जुडी. अशा प्रकारे दुर्वा अर्पण केल्यास गणपती प्रसन्न होतो. मनापासून केलेली मनोकामना पूर्णत्वास जाते. विघ्नहर्ता गणपती भाविकांची इच्छा पूर्ण करतो.

गणेश पुराणातील एका कथेनुसार, कौण्डिन्य ऋषींच्या पत्नींनी गणपतीला ज्या दुर्वा अर्पण केल्या, त्याची तुलना कुबेराच्या धनाशीही होऊ शकत नाही, असे नोंदवण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर अनेक शास्त्रांमध्ये दुर्वांची अद्भूत महिमा वर्णन करण्यात आली आहे. श्रावणातील शुद्ध अष्टमीला दुर्वाष्टमी साजरी केली जाते.

एका पौराणिक कथेनुसार, एकदा यमाच्या दरबारात तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य सुरू होते. यमदेवाला ती अप्सरा खूप आवडली आणि त्याने मध्येच नृत्य थांबवून तिला आपल्या मनोभावना बोलून दाखवली. यावर, पण म्हणून माझे नृत्य थांबवून सगळ्या दरबाराच्या रंगाचा बेरंग कशाला, असे तिने रागाने विचारले.

तेव्हा अप्सरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला. त्या राक्षसाच्या डोळ्यांतून अग्नीच्या ज्वाळा भडकत होत्या. त्याने हसून गडगडाट केला. हे यमधर्मा, माझे नाव अनलासूर. तू तिलोत्तमाचे नृत्य मध्येच थांबवलेस, म्हणून मी तूला खाऊन टाकतो. त्याचा तो कानठळ्या बसवणारा आवाज ऐकून यमधर्म घाबरला आणि पळून गेला. अनलासुर समोर जे दिसेल ते खात सुटला. सर्व देव घाबरून विष्णूंना शरण गेले.

विष्णूंनी सर्व देवतांना अभय दिले. तेवढ्यात तेथे अनलासुर आला. त्याला पाहिल्यावर विष्णूही घाबरले. त्यांनी गणपतीचे स्मरण केले. गणपती बालकाच्या रूपाने विष्णूंपुढे प्रकट झाला. हे विष्णू, आपण माझे स्मरण का केलेत, असे विचारत असतानाच अनलासुराने काही देवांना पकडले. सर्व देव आणि ऋषीमुनी सैरावैरा पळू लागले. गजानन मात्र जागचा हलला नाही.

मग अनलासुराने गजाननाकडे मोर्चा वळवला. त्याने गजाननाला गिळण्यासाठी आपल्या पंज्यांनी उचलले. तो गणपतीला गिळंकृत करणार तोच सर्व देवांनी हाहाःकार केला. अनलासुराच्या हातातील त्या बाल गजाननाने एकदम प्रचंड रूप धारण केले. ते रूप फारच विराट होते. त्याचे डोके आभाळाला भिडले. पाय पाताळात रुतले होते. एका क्षणात गजाननाने अनलासुराला सोंडेत पकडले आणि गिळून टाकले.

अनलासुराला गिळल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली. गणपतीला खूप त्रास होऊ लागला. गणपती स्वःच त्रासात आहे, असे समल्यावर देव, ऋषी, मुनी या सर्वांनी त्यांना जमतील ते उपचार सुरू केले. गणपतीच्या अंगाचा दाह शांत व्हावा आणि त्याला थंड वाटावे, म्हणून अनेक औषधी वनस्पतीचा उपयोग करणे सुरू झाले. वरुणाने थंडगार पाण्याची वृष्टी त्याचा अंगावर करण्यास प्रारंभ केला.

नीलकंठ शंकराने आपल्या गळ्यातील नाग काढून त्याचा गळ्यात घातला. इंद्राने चंद्र गजाननाच्या मस्तकावर ठेवला. परंतु कशाचाही उपयोग होईना. ब्रम्हदेवाने सिद्धी आणि बुद्धी या आपल्या दोन्ही कन्या त्याच्या सेवेसाठी उभ्या केल्या. वाळ्याच्या पंख्याने त्या गणपतीला वारा घालू लागल्या. पण कशाचाही उपयोग होईना. गणपतीच्या अंगाचा दाह होत राहिला.

गणपतीच्या अंगाचा दाह होत आहे, ही वार्ता सर्वत्र पसरल्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ८८ हजार ऋषीमुनींनी प्रत्येकी २१ दुर्वांची जुडी अशा दुर्वा त्याच्या मस्तकावर ठेवल्या आणि काय आश्चर्य दुर्वांकुर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दाह शमला. तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडू लागल्या आणि गणपती पूजनात दुर्वाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे बनले. गजानन म्हणाला की, माझ्या अंगाची आग या दुर्वांमुळे नाहीशी झाली. म्हणून मला दुर्वा अर्पण करणाऱ्या व्यक्‍तींची सर्व पापे नष्ट होतील. ती व्यक्ती बुद्धिमान होईल.