Ganesh Chaturthi 2024: गौरी गणपतीच्या आधी घराबाहेर 'या' वस्तू काढा; राहू-केतूचा दुष्परिणाम टाळा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 12:04 IST2024-09-05T11:50:41+5:302024-09-05T12:04:16+5:30
Ganesh Chaturthi 2024: वास्तुशास्त्रानुसार घरात बंद गोष्टींचे असणे अशुभ मानले जाते. पूर्वी अशा बंद पडलेल्या गोष्टींसाठी एक खोली असे. तिला आपण 'अडगळी'ची खोली म्हणत असू. परंतु, वास्तूमध्ये वापरात नसलेले अडगळीचे सामान ठेवूच नये, असा वास्तुशास्त्राचा आग्रह असतो. त्या वस्तूंचा कळत नकळत आपल्या दैनंदिन प्रगतीवर परिणाम होतो. वास्तुशास्त्रानुसार घरात सुख समृद्धी येण्याकरीता सर्व वस्तू सुस्थितीत असणे गरजेचे आहे. बंद पडलेल्या वस्तू आपल्या प्रगतीची दारे बंद करतात, असे वास्तुशास्त्राचे अभ्यासक सांगतात. तसेच या वस्तूंमुळे राहू केतू तसेच शनीचा दुष्परिणाम सहन करावा लागतो, असे ज्योतिष शास्त्र सांगते. ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2024) आहे आणि पाठोपाठ गौरीचे आगमन ( Gauri Aagman 2024) होणार आहे. गौरी गणपतीच्या निमित्ताने तुमच्याही घरात पुढील वस्तू नादुरुस्त अवस्थेत असतील, तर त्या ठेवू नका, तत्काळ निकालात काढून टाका.

बंद घड्याळ :
घड्याळ आपल्याला वेळ दर्शवते. पुढचा काळ दाखवते. मात्र ते बंद पडले असेल, तर काळ आणि परिस्थितीदेखील स्थगित झाल्यासारखी होते. म्हणून घरात बंद पडलेले घड्याळ अजिबात ठेवू नका. तुमचे नशीब थांबून राहील. अपयशाचा काळ संपणार नाही. म्हणून बंद पडलेले घड्याळ दुरुस्त करून घ्या अन्यथा टाकून द्या.
बिघडलेले कुलूप :
आपल्या धनाचे, घराचे, कागदपत्राचे एवढेच काय, तर प्रवासात सामानाचे संरक्षण करण्यासाठी आपण कुलूपाची मदत घेतो. जेव्हा भाग्योदय होतो, तेव्हा नशीबाचे टाळे उघडले असे आपण म्हणतो. अशी कुलूपासारखी सामान्य परंतु अतिशय महत्त्वाची वस्तू बंद पडलेली असेल, तर ती घरात ठेवू नका. तुमच्या करिअरला कुलूप लागेल आणि प्रगती थांबेल.
तुटलेल्या चपला :
अडगळ करण्याची सवय आपल्याला घातक ठरते. नवीन जोडे घेऊनसुद्धा जुन्या, तुटलेल्या चपलांमध्ये आपला जीव अडकलेला असतो. कधीतरी कामी येतील म्हणत चपलांची पोती प्रत्येक घराच्या कोपऱ्यात पडून असतात. परंतु वास्तुशास्त्र सांगते, झिजलेल्या चपला हे आपण केलेल्या संघर्षाचे प्रतीक आहेत. त्यांचा वापर झाला की टाकून द्या, अन्यथा तुमच्या आयुष्यातील संघर्ष वाढेल.
जुने फाटके कपडे :
आताची परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. पूर्वी दसरा दिवाळीला नव्या कपड्यांची खरेदी केली जात असे. आता बारमाही शॉपिंग सुरू असते. कपाटात ठेवायला जागा नाही, एवढा कपड्यांचा ढीग आपल्याकडे असतो, तरीदेखील जुन्या कपड्यांची वेळीच विल्हेवाट लावली जात नाही. जुने फाटके कपडे दुर्भाग्य दर्शवतात. ते जमवून ठेवल्याने घरातून दुर्भाग्य जाण्याचे नाव घेत नाही.
देवतांचे जुने फोटो किंवा भग्न पावलेल्या मूर्ती :
देवी देवतांच्या फोटोतून आपल्याला सकारात्मकता जाणवते. परंतु, ठराविक काळानंतर फोटो खराब स्थितीत झाले असता ते विसर्जित करावेत. तसेच देवांची भग्न पावलेली मूर्ती देवघरात न ठेवता नदीत विंâवा समुद्रात विसर्जित करावी. भग्न मूर्ती पाहून आपल्या मनात नकारात्मक भाव जागृत होतात आणि आपल्याला प्रसन्न वाटत नाही, म्हणून त्यात वेळोवेळी आवश्यक बदल केले पाहिजेत.