Anant chaturdashi 2022: अनंत चतुर्दशीपासून रोज पाच मिनिटे ओंकार ध्यान सुरू करा आणि बाप्पाकडून 'हे' पाच आशीर्वाद मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 05:37 PM2022-09-08T17:37:35+5:302022-09-08T17:41:19+5:30

Anant chaturdashi 2022: गणपती बाप्पाचे वर्णन करताना संतांनीदेखील त्याला ओंकार स्वरूप म्हटले आहे. संपूर्ण ब्रह्मतत्त्व या ओंकारात सामावले आहे. म्हणून योगशास्त्रातही ओंकार जप, ओंकार ध्यान धारणा करा असे सांगितले जाते. या उपासनेची सुरुवात करण्यासाठी अनंत चतुर्दशीहून चांगला मुहूर्त कोणता असू शकतो? चला तर जाणून घेऊया ओंकार जपाचे वैयक्तिक फायदे!

ओंकार हा बाप्पाचा अंश असलेला मंत्र आहे. त्याच्या उच्चरवाने शरीराभोवती आणि मनाभोवती सकारात्मक वलय निर्माण होते. शारीरिक व्याधींवर ओंकार जपाचा सकारात्मक परिणाम होतो. म्हणून निरोगी आयुष्यासाठी ओंकार जपाची सवय लावून घ्या!

ओंकाराचा उच्चाराने निर्माण होणाऱ्या सकारात्मक लहरी वातावरणात सकारात्मकता निर्माण करतात. कधी निराश असाल, आळसावले असाल तेव्हा काही क्षण ओंकार ध्यान करून बघा, तनामनावरची मरगळ आपोआप दूर होईल.

ध्यानधारणेत ओंकाराला अतिशय महत्त्व आहे. अ, उ, म या तीन अक्षरांच्या उच्चारातून लक्ष एकाग्र होण्यास मदत होते. विशेषतः विद्यार्थ्यांनी आकलनक्षमता वाढवण्यासाठी ओंकार सराव करायला हवा.

आजच्या धकाधकीच्या काळात औषधं घेऊन तणाव दूर करण्यापेक्षा दिवसभरातले काही क्षण स्वतःसाठी राखीव ठेवा आणि डोळे बंद करून मनातील सर्व विषय दूर होईपर्यंत शांतपणे ओंकार जप करा. तणाव, अनिद्रा, नैराश्य इ समस्यांतून मुक्ती मिळेल.

ओंकाराचा उच्चार मोठ्याने नाही तर शक्य तेवढ्या शांतपणे आणि हळू आवाजात करावा. मात्र ते करताना आपल्या सबंध देहाला कंपने जाणवली पाहिजेत. ते चैतन्य आपल्या प्रत्येक रंध्रातून पसरले तरच ओंकार जपाचा योग्य परिणाम शरीरावर दिसून येईल.