पेट्रोलमध्ये इथेनॉल, डिझेलमध्ये आयसोब्युटेनॉल...! एकटा सीएनजी तेवढा राहिला होता, त्यातही ब्लेंडिंग...; वाहनचालकांसाठी ही बातमी का महत्त्वाची आहे?
By हेमंत बावकर | Updated: February 5, 2026 16:40 IST2026-02-05T16:30:24+5:302026-02-05T16:40:57+5:30
Impact of Bio-CNG Blending on engine: अर्थसंकल्प २०२६ मध्ये बायो-सीएनजी ब्लेंडिंगची घोषणा झाली आहे. पेट्रोल-डिझेलनंतर सीएनजी गाड्यांच्या देखभालीचा खर्च वाढणार का? वाचा सविस्तर विश्लेषण.

नुकत्याच मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सीएनजीमध्ये ब्लेंडिंग करण्याची घोषणा करताच अनेकांना धडकी भरली आहे. कारण सध्याच्या काळात एकमेव पर्याय असा होता ज्याच्यावर वाहन चालविणे हे परवडणारे होते. केंद्राने आधीच पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून वाहन चालकांची झोप उडविलेली आहे. डिझेलवाले देखील काही सुटणार नाहीत. कारण डिझेलमध्ये इथेनॉलचाच एक अंश आयसोब्युटेनॉल मिक्स करून त्याची टाटाच्या अल्ट्रॉझवर टेस्टिंग सुरु आहे. अशातच सीएनजी अशा मिक्सपासून दूर असल्याचे मानले जात होते. परंतू, १ फेब्रुवारीला त्याचीही घोषणा करण्यात आली आणि वाहनचालकांत खळबळ उडाली.

नवीन कार ज्यांना घ्यायची आहे, ते देखील संभ्रमात पडलेले आहेत. इलेक्ट्रीक कार महागड्या, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स आहेच पण भविष्यात कितीही टक्क्यांनी वाढवू शकतात. डिझेल कार घ्यायची तर त्यातही आयसोब्युटेनॉल येणार आहे. मग राहिला पर्याय सीएनजीचा, त्यातही आता बायोगॅस मिक्स केला जाणार असल्याने लोकांसमोर यक्षप्रश्न उभा राहिला आहे.

कितीही जरी नाकारले तरी इथेनॉलने हजारो वाहनचालकांना त्याचे रंग दाखविण्यास सुरुवात केली आहे. डिझेलमध्ये काय गोंधळ उडतोय ते येणार काळ सांगणार आहे. परंतू, आता सीएनजीमध्ये देखील बायोगॅस मिक्स केल्यावर इंजिनवर काय परिणाम होतो, मायलेजवर काय परिणाम होतोय याची चिंता आता वाहनचालकांना सतावू लागली आहे.

सीतारामन यांनी 'बायो-सीएनजी' (Bio-CNG) ब्लेंडिंगचे नवे धोरण प्रस्तावित केले आहे. यामुळे काय होईल तर सीएनजी गाड्यांच्या इंधन खर्चात आणि प्रदूषणात घट (किंचित) होण्याची शक्यता आहे. मायलेज आणि पावरमध्ये ड्रॉप होण्याची देखील शक्यता आहे. शिवाय जी इंजिन सीएनजीसाठी बनविलेली आहेत, त्यांना बायोगॅससाठी देखील काम करणे काहीसे कठीण ठरण्याची शक्यता आहे.

ज्याप्रमाणे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळले जाते (Ethanol Blending), त्याच धर्तीवर आता नैसर्गिक वायूमध्ये (CNG) बायोगॅस मिसळला जाणार आहे. या प्रक्रियेला 'बायो-सीएनजी ब्लेंडिंग' असे म्हणतात. सेंद्रिय कचरा आणि शेतीतील अवशेषांपासून हा बायोगॅस तयार केला जातो, ज्याची गुणवत्ता सर्वाधिक कळीचा मुद्दा ठरणार आहे.

सरकारने या प्रक्रियेला चालना देण्यासाठी बायोगॅसच्या उत्पादनावरील केंद्रीय उत्पादन शुल्क पूर्णपणे माफ करण्याचे प्रस्तावित केले आहे. यामुळे बायो-सीएनजीचा उत्पादन खर्च कमी होईल आणि त्याचा फायदा वाहनधारकांना मिळू शकेल.

वाहनचालकांसाठी होणारे फायदे
बायोगॅस स्थानिक पातळीवर उत्पादित होत असल्याने आयातीवरील अवलंबित्व कमी होईल, परिणामी इंधनाचे दर स्थिर राहण्यास मदत होईल. बायो-सीएनजीमुळे हरितगृह वायूंचे (GHG) उत्सर्जन कमी होते, ज्यामुळे हवा प्रदूषण कमी होईल. तज्ज्ञांच्या मते, विशिष्ट मर्यादेत बायोगॅस मिसळल्यास इंजिनच्या क्षमतेवर किंवा टिकाऊपणावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. बाकी याचे दुष्परिणाम प्रत्यक्षात वापर सुरु होईल तेव्हा समजणार आहेत.

सीएनजीची किंमत कमी होईल...?
सीएनजीची किंमत कमी होईल असे तुम्हाला वाटत असेल तर आपल्याला इथेनॉल ब्लेंडिंगचे उदाहरण घ्यावे लागेल, तेव्हा देखील असेच सांगितले जात होते. परंतू, इथेनॉल ब्लेंड पेट्रोलची किंमत काही कमी केलेली नाही. साध्या पेट्रोलच्याच दराने हे ई२० पेट्रोल विकले जात आहे. उलट काहीसे शुद्ध किंवा चांगले परफॉर्मन्स देणारे पेट्रोल १५०-१६० रुपयांना विकले जात आहे. यामुळे सीएनजीमध्ये बायोगॅस मिक्स केल्यावर त्याची किंमत कमी होईल हे एक मृगजळच ठरणार आहे.

समोरील आव्हाने
कचऱ्याचे योग्य वर्गीकरण न झाल्याने निर्माण होणाऱ्या गॅसची गुणवत्ता तेवढी नसणार, यामुळे इंजिनच्या महत्त्वाच्या भागांची झीज होणे, लवकरच बिघाड होणे आणि देखभालीचा खर्च वाढ वाढणे आदी गोष्टींची टांगती तलवार असणार आहे. हे दुष्परिणाम वाहन चालकांनी ई२० पेट्रोलमधून भोगलेले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे कसोटी पेट्रोल इंजिनची आहे. कारण एकाचवेळी त्याला पेट्रोल, इथेनॉल, सीएनजी अन् बायोगॅस जाळावा लागणार आहे.


















