महायुतीतील बेबनावाने परभणीतील प्रयोग फसला; लोकसभा पराभवाची जबाबदारीही कोणी घेईना

By मारोती जुंबडे | Published: June 11, 2024 01:37 PM2024-06-11T13:37:09+5:302024-06-11T13:38:21+5:30

या पराभवाची जबाबदारी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी की रासपची आहे, हे कळायला मात्र मार्ग नाही.

The experiment in Parabhani Loksabha was foiled by mismanagement in Mahayuti; No one took responsibility for the Lok Sabha defeat | महायुतीतील बेबनावाने परभणीतील प्रयोग फसला; लोकसभा पराभवाची जबाबदारीही कोणी घेईना

महायुतीतील बेबनावाने परभणीतील प्रयोग फसला; लोकसभा पराभवाची जबाबदारीही कोणी घेईना

परभणी : लोकसभा निवडणुकीत सुरुवातीपासूनच महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यात वेगवेगळे प्रयोग करून उमेदवारी उशिरा जाहीर केल्या. त्याचा  मोठा फटका परभणी जिल्ह्यात बसल्याचे निवडणुकीच्या निकालानंतर दिसून येत आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षातील पदाधिकारी व नेत्यांतील बेबनावाचा मोठा फटका राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला बसल्याने पराभव पत्कारावा लागला.

महाविकास आघाडीकडून खा. संजय जाधव यांची उमेदवारी कायम राहील हे सुरुवातीपासूनच फिक्स असल्याने त्यांनी तयारी सुरू केली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर हेच उमेदवार राहतील हे जवळपास निश्चित मानले जात होते. मात्र राज्यस्तरावर घडलेल्या वेगवेगळ्या घडामोडीनंतर परभणीची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या कोट्यातून रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना देण्यात आली. मात्र वरिष्ठ नेत्यांचा परभणीतील प्रयोग महायुतीच्या बेबनावाने फसल्याचे निकालातून स्पष्ट झाले.

छातीठोकपणाचे दावे गेले कोठे?
महायुतीकडून डझन भर नेत्यांची रासपला साथसंगत होती. त्याचबरोबर भाजपकडून बुथनिहाय संघटन होते, असे असतानाही महायुतीच्याच बालेकिल्यामध्ये महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले. प्रचारा दरम्यान छातीठोकपणे विजय आमचाच असे सांगणारे मतदानाच्या दिवशी मात्र नामानिराळेच दिसून आले. 

फडणविसांच्या कानपिचक्याही निष्प्रभ
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या परभणीच्या वाऱ्या वाढल्या होत्या. त्याचबरोबर नांदेड येथे फडणवीस यांनी बैठक घेवून परभणीच्या काही पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या होत्या. मात्र त्यानंतरही लोकसभा निवडणुकीत ते पराभव रोखू शकले नाहीत. त्यामुळे कानपिचक्याही निष्प्रभ ठरल्या.

पराभव कोणाचा कळायला मार्ग नाही...
कागदावर जबरदस्त असणाऱ्या महायुतीला लोकसभेत पराभवाला सामोरे जावे लागले. संजय जाधव यांनी तब्बल १ लाख ३४ हजार मतांनी विजय मिळविला. त्यामुळे या पराभवाची जबाबदारी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी की रासपची आहे, हे कळायला मात्र मार्ग नाही. याचे आत्मचिंतन प्रत्येक जण आपापल्या परीने करतील.

कार्यकर्त्यांना जाळे बुथवर दिसलेच नाही
भाजप असा एकमेव पक्षा आहे जो बुथनिहाय काम करतो. बुथनुसारच त्यांची निवडणुकीतील रचनाही दिसून येते. त्यामुळे सर्वाधिक कार्यकर्त्यांचे जाळे भाजपाकडे आहे, असे समजूनही परभणीत मात्र परिस्थिती वेगळी राहिली. काही बुथवर तर याच भाजपाला कार्यकर्तेही मिळाले नसल्याची स्थिती आहे.

Web Title: The experiment in Parabhani Loksabha was foiled by mismanagement in Mahayuti; No one took responsibility for the Lok Sabha defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.