'भाजपचा डाव ओळखा, शिंदे साहेब आता परत या!' उद्धवसेनेच्या खासदाराचे भावनिक आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 12:16 IST2026-01-21T12:11:26+5:302026-01-21T12:16:46+5:30
भाजपच्या चाणक्य नीतीला उत्तर द्यायचं असेल तर एकत्र या!दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी खासदारांची भावनिक साद.

'भाजपचा डाव ओळखा, शिंदे साहेब आता परत या!' उद्धवसेनेच्या खासदाराचे भावनिक आवाहन
परभणी: परभणी महानगरपालिका निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर आणि शिंदेसेनेचा 'भोपळा'ही न फुटल्याने राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपचा डाव ओळखण्याचा सल्ला देत, दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
भाजपची चाणक्य नीती आणि शिंदेसेनेची कोंडी
पत्रकारांशी बोलताना खासदार जाधव यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, "भाजप ही चाणक्य नीती वापरणारा पक्ष आहे. त्यांनी आधी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाचं गाजर दाखवलं आणि शिवसेनेचे दोन तुकडे केले. आधी उद्धव ठाकरे यांना संपवण्याचा प्रयत्न झाला आणि आता एकनाथ शिंदे यांना संपवण्याचा घाट घातला जात आहे. महापालिका निवडणुकीत मराठवाड्यात शिंदेसेनेला बसलेला फटका हा याच नीतीचा भाग आहे."
"बाळासाहेबांची पुण्याई अन् रेडिमेड माणसं"
खासदार संजय जाधव यांनी अत्यंत कडक शब्दात सुनावले की, एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र पिंजून पक्ष उभा केलेला नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी रक्त आटवून ही शिवसेना उभी केली. शिंदे यांनी केवळ 'रेडिमेड' माणसं आणि चिन्ह उचलले आहे. "शिंदे साहेबांनी आता तरी विचार करावा, भाजपचा हा डाव हाणून पाडण्यासाठी त्यांनी पुन्हा मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंच्या सोबत आले पाहिजे. कारण शेवटी बाप हा बापच असतो," असेही ते भावूक होऊन म्हणाले.
परभणी पॅटर्नचा दाखला
मराठवाड्यात सर्वत्र शिंदेसेनेचा सपाटून पराभव झाला असताना परभणीत मात्र ठाकरे गटाने आपली ताकद दाखवून दिली आहे. भाजप आर्थिक बळावर निवडणुका जिंकत असली तरी, शिवसैनिक जेव्हा एकत्र असतो तेव्हा कुणाचीही वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नसते, याची आठवणही त्यांनी करून दिली. आता संजय जाधव यांच्या या आवाहनावर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.