तुम्ही कमळाची काळजी घ्या, पुढील पाच वर्षे आम्ही..; सीएम फडणवीसांचे परभणीकरांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 19:07 IST2026-01-05T19:06:11+5:302026-01-05T19:07:06+5:30
Parbhani Municipal Corporation Election 2026 : 'परभणीच्या विकासासाठी भाजप तत्पर!'

तुम्ही कमळाची काळजी घ्या, पुढील पाच वर्षे आम्ही..; सीएम फडणवीसांचे परभणीकरांना आवाहन
Parbhani Municipal Corporation Election 2026 : परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य ‘विजय संकल्प सभा’ पार पडली. या सभेला राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी परभणीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.
परभणीच्या विकासासाठी भाजप तत्पर
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, परभणी शहराच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकार एकत्रितपणे काम करत आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत परभणीसाठी पाणीपुरवठा प्रकल्प आणि भुयारी गटार योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे परभणीकरांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होईल आणि भुयारी गटार योजनेमुळे शहर दुर्गंधीमुक्त होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पीएम ई-बस सेवा; प्रदूषणमुक्त शहराकडे वाटचाल
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात परभणीसाठी ₹14 कोटींचा ‘पीएम ई-बस सेवा’ प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. या अंतर्गत परभणी शहराला 40 ई-बस मिळणार असून, त्यामुळे सार्वजनिक वाहतूक मजबूत होईल आणि शहर प्रदूषणमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करेल.
LIVE | परभणी महानगरपालिका निवडणूक प्रचारार्थ 'जाहीर सभा'
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 5, 2026
🕓 दु. ३.५५ वा. | ५-१-२०२६📍परभणी.@BJP4Maharashtra#Maharashtra#Parbhani#परभणी_महानगरपालिकाhttps://t.co/9BS7cAGhIF
मेघना बोर्डीकर यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या कार्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, CIIIT परभणी येथे आल्यापासून त्यांनी टाटा ट्रस्टसोबत मोठा करार करून शहरात इनोव्हेशन आणि इनक्युबेशन सेंटर सुरू केले. या उपक्रमामुळे येत्या काळात सुमारे 3000 परभणीकरांना प्रशिक्षण मिळेल आणि येथूनच रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्क्या घरांचा निर्धार
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला पक्के घर देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पुढील पाच वर्षांत परभणीतील झोपडपट्टीवासीय आणि गरीब नागरिकांना जमिनीचा मालकी हक्क आणि पक्के घर देण्याचा आमचा ठाम निर्धार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मतदारांना आवाहन
सभा समाप्तीपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मतदारांना आवाहन करत म्हटले, येत्या 15 तारखेला परभणीकरांनी कमळाची काळजी घ्यावी. पुढील पाच वर्षे परभणी शहराची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेऊ.