परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 18:41 IST2025-12-30T18:39:13+5:302025-12-30T18:41:28+5:30
कार्यकर्ते नाराज होवू नयेत म्हणून मैत्रीपूर्ण लढती

परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
परभणी : काँग्रेस व उद्धवसेनेने परभणी महापालिका निवडणुकीसाठी आघाडीवर शिक्कामोर्तब केले. मात्र १२ ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचे चित्र आहे.
शिवसेना व भाजपच्या युतीची चर्चा सुरू झाल्यानंतर उद्धवसेना व काँग्रेसनेही आघाडीत लढण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. उभयंतांमध्ये अनेक बैठका झाल्या. मात्र जागावाटपाचे सूत्र काही ठरत नव्हते.
उद्धवसेनेने अचानकच शहरात सर्वत्रच ताकद आजमावण्याची तयारी केली. तर काँग्रेस मागच्या वेळी सत्ताधारी असल्याने मोठा भाऊ म्हणून अडून बसली होती. मागच्या सभागृहातील नगरसेवकांच्या पक्षांतरानंतरही अनेक जागांवर दावा केला जात होता. शेवटी या तहात उद्धवसेनेनेच बाजी मारल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. उद्धवसेना एकूण ४५ जागा लढवत आहे. यापैकी १२ मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. यामुळे जवळपास ३३ जागांवर त्यांनी आघाडीत स्वतंत्रपणे लढण्याचा मार्ग मोकळा करून घेतला आहे. काही प्रभागांमध्ये काँग्रेसकडेही उमेदवार नसल्याने त्यांनी तीन प्रभाग थेट उद्धवसेनेला द्यावे लागल्याचे चित्र आहे.
आघाडीतील बोलणीप्रमाणे उमेदवार दिले
याबाबत उद्धवसेनेचे महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर यांना विचारले असता ते म्हणाले, मागील दोन दिवसांत खा.संजय जाधव, आ.डॉ.राहुल पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेससोबत आघाडीची बोलणी झाली. आम्ही ४५ जागांवर निवडणूक लढवत आहोत. यापैकी १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.
कार्यकर्ते नाराज होवू नयेत म्हणून मैत्रीपूर्ण लढती
याबाबत काँग्रेस नेते माजी आ. सुरेश देशमुख म्हणाले, उद्धवसेना व काँग्रेसची आघाडी अंतिम झाली आहे. आम्ही आघाडीत मिळालेल्या २० जागा स्वतंत्रपणे तर १२ ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीत अशा ३२ जागा लढत आहोत. ज्या जागा जिंकण्याचा विश्वास आहे, अशा जागांवरच उमेदवार देवून सर्व शक्ती त्या उमेदवारांच्या मागे उभी करण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा आम्ही परभणी मनपावर सत्ता राखू असा विश्वास आहे.