घरगड्याच्या उमेदवारीसाठी सुरेश वरपूडकरांनी युती तोडण्याचे पाप केले; शिंदेसेनेचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:41 IST2025-12-31T12:40:05+5:302025-12-31T12:41:11+5:30
माझ्यावरील आरोप तथ्यहीन- वरपूडकर

घरगड्याच्या उमेदवारीसाठी सुरेश वरपूडकरांनी युती तोडण्याचे पाप केले; शिंदेसेनेचा आरोप
परभणी: हिंदुत्वासाठी व परभणीच्या विकासासाठी आम्ही भाजपसोबत युती करुन महापालिकेवर युतीचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्नशील होतो. मात्र, भाजप नेते सुरेश वरपूडकर यांनी घरगड्यासाठी युती तोडल्याचा आरोप शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी पत्रकार परिषदेत केला.
भरोसे म्हणाले, भाजपने हिंदुबहुल भागात 33 पैकी 13 जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता. शेवटी 12 जागा देण्याचा निरोप मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामार्फत दिला. तोही आम्ही मान्य केला. मात्र, त्यानंतरही त्यांना वाढीव जागा हव्या होत्या. दिलेला शब्द पाळला नाही. आमचा केसाने गळा कापला. त्यांच्या नेत्यांचाच मान राखला नाही. निवडणूक प्रमुख सुरेश वरवूडकर यांच्याकडे घरकाम करणाऱ्याला तिकीट द्यायचे असल्याने युतात मिठाचा खडा टाकला. हिंदुत्वाला तिलांजली दिली.
मात्र, तरीही आम्ही जेवढे उमेदवार दिले, तेवढ्यातून सरस निकाल देऊ. अजूनही माघारीपर्यंत युती झाली तर ठीक, अन्यथा जेथे आमचा उमेदवार नाही, तेथे उतरांना पुरस्कृत करू. जर भाजपने 62 जागांवर उमेदवार दिले, तर त्यांच्या मनात आधीच पाप होते. त्यांनी विश्वासघात केला, हे सिद्धच होते. वरपूडकर यांचा काँग्रेस, उद्धसेना, राष्ट्रवादीपासून पार गुट्टे यांच्या आघाडीपर्यंत सगळीकडे हात असलल्याचा आरोपही भरोसे यांनी केला.
माझ्यावरील आरोप तथ्यहीन- वरपूडकर
भाजपचा निवडणूक प्रमुख असलो तरीही माझ्याकडे फक्त 4,5 व 15 या तीन प्रभागांची जबाबदारी हआहे. प्रभाग क्रमांक 15 मध्ये सामाजिक गणितांमध्ये जी जागा आम्ही देत होतो, ती घ्यायला शिंदेसेना तयार नव्हती. प्रभाग 5 मध्ये जागा दिली तर त्यांच्याकडे उमेदवार नव्हता. जो उमेदवार नंतर दिला, त्यामुळे सामाजिक गणित बिघडत होते. ते जराही मागेपुढे सरकारयला तयार नव्हते.
माझ्यावरील आरोपात काही तथ्य नाही. तरीही युती टिकवण्याचा प्रयत्न राहील. भाजपला मानणाऱ्या समाजांना योग्य प्रतिनिधित्व देत न्याय दिला आहे. भाजपला कायम मते देणाऱ्या समाजांनाही न्याय मिळावा, यासाठी उमेदवारी दिल्या आहेत. ओबीसींनाही अपेक्षित संख्येत सोबत घेतले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत भाजपचे चांगले बळ महापालिकेच्या सभागृहात दिसेल, असा विश्वास वरपूडकर यांनी व्यक्त केला.