काँग्रेसने ७० वर्षे शहरी विकासाकडे दुर्लक्ष केल्यानेच दुर्दशा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 06:38 IST2026-01-06T06:36:17+5:302026-01-06T06:38:25+5:30
राज्यात लखपती दीदी कार्यक्रम सुरू असून, एक कोटी लखपती दीदी होणार. देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

काँग्रेसने ७० वर्षे शहरी विकासाकडे दुर्लक्ष केल्यानेच दुर्दशा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लोकमत न्यूज नेटवर्क, परभणी : राज्यात गेल्या अनेक दशकांत शहरांची लोकसंख्या वाढत गेली. मात्र, काँग्रेसने ७० वर्षे शहरी विकासाकडे दुर्लक्ष केले. परिणामी पाणीटंचाई, रोगराई, प्रदूषण आणि मूलभूत सुविधांचा अभाव निर्माण झाला. ज्यांना जनतेने सत्ता दिली, त्यांनी शहरांचा विकास करण्याऐवजी स्वतःचाच शंभर टक्के विकास केला, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी सोमवारी त्यांची सभा झाली. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. फडणवीस म्हणाले, भाजप सरकारने गावांबरोबरच शहरांचाही विकास सुरू केला असून, स्मार्टसिटी, अमृत योजना, स्वच्छ शहर अभियानांतर्गत राज्यातील महानगरांसाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद केली. त्याचा थेट लाभ मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्यांना झाला आहे.
नांदेडमधील प्रत्येकाला मिळेल हक्काचे घर
नांदेड : केंद्र आणि राज्य सरकारकडून गरीब, झोपडवट्टीवासीय आणि कच्च्या घरात राहणाऱ्या मंडळींना पक्की घरे देण्यात येत आहेत. परंतु त्यांच्याकडे जागाच नाही. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी निर्णय घेऊन ते ज्या ठिकाणी राहतात, त्याच ठिकाणचे मालकी हक्क देण्यास सुरुवात झाली आहे. नांदेड शहरातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळालेच पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. इंदिरा गांधी मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, खा. अशोक चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे उपस्थित होते.
‘देवाभाऊ आहे... एक कोटी दीदी लखपती होणार’
जालना : राज्यात लखपती दीदी कार्यक्रम सुरू असून, एक कोटी लखपती दीदी होणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना येथील सभेत सांगितले. देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
२०१४ मध्ये भाजपचे केंद्र आणि राज्यात सरकार आले. तेव्हापासून ग्रामीण भागाचाच नव्हे तर शहरी भागांच्या विकासाची गती वाढली आहे. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, रोजगार निर्मिती आदी विविध क्षेत्रांच्या प्रगतीसाठी भाजप सरकारने मोठा निधी दिला आहे. झोपडपट्टीधारकांना पीआरकार्ड देण्याचा निर्णय घेतला असून, कच्चे घर असेल त्यांना पक्के घर बांधण्यासाठी प्रधानमंत्री योजनेतून निधी दिला जाणार आहे. विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी मतदारांनी भाजपच्या हाती सत्ता द्यावी, असे फडणवीस म्हणाले.