स्वतःपुरता प्रचार केल्यास थेट पॅनलमधून बाहेर काढणार; बावनकुळेंचा उमेदवारांना कडक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 17:37 IST2026-01-05T17:36:41+5:302026-01-05T17:37:04+5:30
या सूचनांमुळे उमेदवारांमध्ये शिस्त आणि एकजूट राखण्यावर भर देण्यात आला आहे.

स्वतःपुरता प्रचार केल्यास थेट पॅनलमधून बाहेर काढणार; बावनकुळेंचा उमेदवारांना कडक इशारा
परभणी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी परभणी येथे पक्षाच्या उमेदवारांची व पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी निवडणूक प्रचाराबाबत स्पष्ट आणि कडक सूचना दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
बावनकुळे यांनी सांगितले की, निवडणूक पॅनल पद्धतीने लढविली जात असताना कोणत्याही उमेदवाराने केवळ स्वतःपुरताच प्रचार करणे पक्षशिस्तीला धरून नाही. प्रभागातील चारही उमेदवारांनी एकत्रितपणे प्रचार करणे आवश्यक असून, मतदारांकडे जाताना संपूर्ण पॅनलसाठीच मतदान मागावे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. कोणीही उमेदवार वैयक्तिक मतांसाठी स्वतंत्र प्रचार करीत असल्याचे आढळल्यास संबंधित उमेदवाराला कोणतीही तडजोड न करता थेट पॅनलमधून बाहेर काढण्यात येईल, असा कडक इशाराही त्यांनी दिला.
पक्षाची ताकद ही संघटनात्मक एकजुटीत असून, व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपेक्षा पक्षहिताला प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत प्रचाराची दिशा, मतदारांशी संपर्क वाढविण्याच्या रणनीती, तसेच पॅनलमधील समन्वय यावर सविस्तर चर्चा झाली. उमेदवारांनी एकमेकांशी समन्वय ठेवून काम केल्यासच अपेक्षित यश मिळू शकते, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
या सूचनांमुळे उमेदवारांमध्ये शिस्त आणि एकजूट राखण्यावर भर देण्यात आला असून, आगामी निवडणुकीत भाजप पॅनल पद्धतीने आक्रमकपणे मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत या बैठकीतून मिळाले आहेत. या सूचनांमुळे उमेदवारांमध्ये शिस्त आणि एकजूट राखण्यावर भर देण्यात आला असून, आगामी निवडणुकीत भाजप पॅनल पद्धतीने आक्रमकपणे मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत या बैठकीतून मिळाले आहेत. या बैठकीस पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे, जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.