परभणीत खासदार संजय जाधव अन् मतदान निरीक्षकांत वाद; दोन प्रभागांतील उमेदवारांतही बाचाबाची
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 15:08 IST2026-01-15T15:06:58+5:302026-01-15T15:08:45+5:30
या वादादरम्यान खासदार संजय जाधव यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या शहरातील फिरण्यावरही प्रश्न उपस्थित केला.

परभणीत खासदार संजय जाधव अन् मतदान निरीक्षकांत वाद; दोन प्रभागांतील उमेदवारांतही बाचाबाची
- मारोती जुंबडे
परभणी : परभणी शहर महानगरपालिकेच्या १६ प्रभागांतील ६५ नगरसेवकांसाठी गुरुवारी सकाळी ७.३० वाजेपासून मतदानास सुरुवात झाली. मात्र, मतदानाच्या पहिल्याच काही तासांत राजकीय आरोप-प्रत्यारोप, शाब्दिक वाद आणि उमेदवारांतील बाचाबाचीमुळे शहरातील वातावरण चांगलेच तापले. मतदानादरम्यान खासदार संजय जाधव आणि मतदान निरीक्षक मेघना कवाली यांच्यात शाब्दिक वाद झाला.
प्राथमिक माहिती अशी की, मतदान निरीक्षक मेघना कवाली यांनी खासदार जाधव हे मतदानासाठी माणसे घेऊन आल्याची तक्रार पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्याकडे केल्याचे समजताच खासदार जाधव संतापले. मी मतदानासाठी आलो आहे. कोणतेही कारण नसताना माझी तक्रार एसपींकडे करता. भाजपाच्या तालावर काम न करता सध्याची खरी परिस्थिती समोर आणा, असे म्हणत त्यांनी मतदान निरीक्षकांना सुनावले आणि तेथून निघून गेले. या प्रकारामुळे काही काळ संबंधित मतदान केंद्र परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पालकमंत्र्यांच्या फिरण्यावर प्रश्नचिन्ह
या वादादरम्यान खासदार संजय जाधव यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या शहरातील फिरण्यावरही प्रश्न उपस्थित केला. मी शहराचा मतदार आहे. माझ्यासोबत कुटुंब असताना माझी तक्रार केली जाते; मात्र पालकमंत्री या शहराच्या मतदार नाहीत, तरीही त्या मतदान केंद्रांवर पाहणी करत आहेत. त्यांना केंद्रावर येण्याची परवानगी कोणी दिली? असा सवाल खासदार जाधव यांनी उपस्थित केला. एकीकडे मतदान प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे या घडामोडींमुळे निवडणूक वातावरणाला तणावाची किनार लागली असून, प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येत आहेत.
राष्ट्रवादी-कॉग्रेस उमेदवारांमध्ये बाचाबाची
दरम्यान, शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील मोमीनपुरा भागात काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली. परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसताच पोलीस प्रशासनाने तातडीने धाव घेतली. सध्या त्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय, पारवा गेट नाका परिसरातही दोन उमेदवारांमध्ये वाद झाला. या घटनेनंतर निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून हस्तक्षेप करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.