'धनुभाऊ, विजय मल्ल्याच्या आणि तुमच्या आवडी-निवडी एकच'; गुट्टेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 12:16 IST2025-12-02T12:09:47+5:302025-12-02T12:16:52+5:30
गंगाखेडच्या रणांगणात रत्नाकर गुट्टेंचा धनंजय मुंडेंवर घणाघाती हल्लाबोल

'धनुभाऊ, विजय मल्ल्याच्या आणि तुमच्या आवडी-निवडी एकच'; गुट्टेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
गंगाखेड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी गंगाखेडमध्ये राजकीय वातावरण चुरशीला पोहोचले आहे. दोन दिवसांपूर्वी गंगाखेड येथील सभेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर केलेल्या टीकेचा सोमवारी गुट्टेंनी परतावा दिला. गुट्टे म्हणाले,धनूभाऊ, तुम्ही मला नीरव मोदी म्हणता, पण तुम्हीच तर विजय मल्ल्या आहात! विजय मल्ल्याच्या आणि तुमच्या आवडी-निवडी एकच आहेत. या विधानाने सभेत उपस्थितांमध्ये मोठी खळबळ उडाली.
धनंजय मुंडेंनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आपला पराभव करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत गुट्टेंनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला. तुम्ही माझ्याविरोधात कोणाला उमेदवारी दिली. किती ताकद लावली, हे मला पूर्ण माहिती आहे. पण गंगाखेडची जनता माझं बुलेटप्रूफ जॅकेट आहे, म्हणूनच मी प्रचंड मताधिक्याने जिंकलो,असे ते म्हणाले. तुम्ही गंगाखेडला आलात. मला परळीला पोचायला फक्त १५ मिनिटं लागतात. मी राजा आहे. मी कुठल्याही पक्षाच्या स्टेजवर जाऊ शकतो. पण धनूभाऊ, तुमचा निकाल लावल्यानंतरच मी थांबणार आहे,असे गुट्टेंनी सांगितले.
इंदौरमध्ये तुमचा मर्डर झाला असता...
गुट्टेंनी पुढे आणखी एक खळबळजनक दावा करत म्हटले, धनूभाऊ, तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता; पण दिवंगत भय्यूजी महाराजांनी तुम्हाला वाचवलं. तुम्ही कोणत्या हॉटेलात होता, हे देखील मला माहित आहे. पण सगळंच आज सांगणार नाही. गुट्टेंच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळातही चर्चा रंगू लागली आहे.