परभणीत कोंबिंग ऑपरेशन; मनपा निवडणुक पार्श्वभूमीवर दीडशे फरार आरोपी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 18:19 IST2026-01-08T18:18:58+5:302026-01-08T18:19:19+5:30
परभणी जिल्ह्यात पोलिसांचे गुरुवारी पहाटे कोंबिंग ऑपरेशन

परभणीत कोंबिंग ऑपरेशन; मनपा निवडणुक पार्श्वभूमीवर दीडशे फरार आरोपी गजाआड
- राजन मंगरुळकर
परभणी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलाने गुरुवारी पहाटे तीन ते सकाळी सहापर्यंत गुन्हेगारांविरुद्ध कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या तसेच विविध न्यायालयीन वॉरंटमधील आरोपींना शोधून काढत त्यांची धरपकड करण्यात आली. यामध्ये दीडशे फरार आरोपींना गजाआड करण्यात आले तसेच अवैध शस्त्र धारकांवर सुद्धा कडक कारवाई करण्यात आली.
पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशाने जिल्हाभरात ही विशेष मोहीम राबविण्यात आली. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी पहाटे तीन ते सकाळी सहा वाजेपर्यंत हे कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये अग्निशस्त्र व घातक शस्त्रांचा वापर करणाऱ्या गुन्हेगारांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. कोंबिंग ऑपरेशनमध्ये वॉरंट व गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या एकूण १५० आरोपींना अटक केली.
अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींच्या घर झडतीतून चार तलवारी, एक खंजीर जप्त करण्यात आले. यामध्ये शेख जावेद शेख साहेब लाल, सोनूसिंग पुनमसिंग टाक, माखनसिंग पूनमसिंग टाक, लक्ष्मण किशन माने अशा चौघांविरुद्ध विविध ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच गुन्हे करण्याच्या उद्देशाने ओळख लपवून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या चार जणांवर महाराष्ट्र पोलिस कायदा १२२ प्रमाणे गुन्हे नोंद केले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात दोन उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हा शाखेचे प्रभारी अधिकारी, २५ अधिकारी, अंमलदार तसेच १९ ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, १९० अंमलदारांनी केली.