परभणीत उद्धवसेनेचे सय्यद इकबाल होणार महापौर, तर काँग्रेसचे गणेश देशमुख उपमहापौर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 11:28 IST2026-02-12T11:28:06+5:302026-02-12T11:28:25+5:30
लॉन्सवर ठरली रणनीती, आता सभागृहात होणार सत्तेचा राज्याभिषेक.

परभणीत उद्धवसेनेचे सय्यद इकबाल होणार महापौर, तर काँग्रेसचे गणेश देशमुख उपमहापौर
परभणी: परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीचा सस्पेन्स आता संपला आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापौरपदी उद्धवसेनेचे सय्यद इकबाल तर उपमहापौरपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक गणेश देशमुख यांच्या नावावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. आता केवळ बी. रघुनाथ सभागृहात पीठासीन अधिकाऱ्यांकडून अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे.
नव्या आणि जुन्याचा संगम
या निवडीत उद्धवसेनेने 'नव्या चेहऱ्याला' संधी दिली आहे. प्रभाग क्रमांक ८ 'क' मधून पहिल्यांदाच निवडून आलेले सय्यद इकबाल आता थेट शहराचे महापौर म्हणून जबाबदारी सांभाळतील. दुसरीकडे, अनुभवाला प्राधान्य देत काँग्रेसने प्रभाग १ 'ड' मधील तीन वेळा निवडून आलेले अनुभवी नगरसेवक गणेश देशमुख यांची उपमहापौर पदासाठी निवड केली आहे.
लॉन्सवरील बैठकीत झाला अंतिम फैसला
सकाळी पाथरी रोडवरील मोरया लॉन्स येथे उद्धवसेना आणि काँग्रेसच्या ३७ नगरसेवकांची खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही नावांबाबत एकमत झाल्यानंतर सर्व सदस्य एकत्रितपणे सभागृहाकडे रवाना झाले. मुंबईहून मध्यरात्री दाखल झालेल्या नगरसेवकांनी या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली.
सभागृहात कडेकोट बंदोबस्त
निवडणूक प्रक्रिया पार पडणाऱ्या बी. रघुनाथ सभागृहाला सध्या छावणीचे स्वरूप आले आहे. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत ही विशेष सभा सुरू होत आहे. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात प्रत्येक सदस्याचे ओळखपत्र तपासूनच त्यांना सभागृहात प्रवेश दिला जात आहे. थोड्याच वेळात परभणीच्या या नव्या नेतृत्वाची अधिकृत घोषणा होणार असून कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी सुरू केली आहे.