परभणीत १९७ जण मैदानाबाहेर, १६ प्रभागांत एकूण ४११ उमेदवार रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 18:08 IST2026-01-03T18:07:08+5:302026-01-03T18:08:12+5:30
अर्ज माघारी घेण्यासाठी आलेल्या उमेदवारांनी अर्ज मागे घेताच काहींनी गळ्यात गळ्यात घालून पुन्हा फोटो काढले

परभणीत १९७ जण मैदानाबाहेर, १६ प्रभागांत एकूण ४११ उमेदवार रिंगणात
परभणी : बंडखोरांसह अपक्ष उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्यासाठी शुक्रवारी सर्वच ठिकाणी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. याला बहुतांश प्रभागांमध्ये यश आले असून शुक्रवारी दिवसभरात एकूण १६२ उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतली आहे. अर्ज माघारीच्या दोन दिवसांत एकूण १९७ उमेदवार रिंगणाबाहेर पडल्याने आता १६ प्रभागांत एकूण ४११ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे सर्वच प्रभागांतील लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यानंतर गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसात बंडखोर तसेच अपक्षांनी अर्ज माघारी घ्यावेत, यासाठी विविध पक्षांच्या प्रमुख उमेदवारांनी देव पाण्यात ठेवले होते. त्यानुसार गुरुवारी पहिल्या दिवशी ३५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. पहिल्या दिवशी अनेकांना यामध्ये यश आले नव्हते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच अनेकांनी त्यांच्या माध्यमातून काहींची मनधरणी सुरू केली होती.
सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेमध्ये कल्याण मंडपम, नटराज रंग मंदिर आणि मनपा मुख्य इमारत महापौर कक्ष तसेच बी. रघुनाथ सभागृह आणि पंचायत समिती या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्ष परिसरात अर्ज माघारी घेण्यासाठी उमेदवारांना सोबत घेऊन अनेकजण दाखल होत होते. अर्ज माघारी घेण्यासाठी आलेल्या उमेदवारांनी अर्ज मागे घेताच काहींनी गळ्यात गळ्यात घालून पुन्हा फोटो काढले, तर दिलजमाई झाल्याचे, अर्धी लढाई जिंकल्याचा आविर्भाव काहींना आला होता. काहींचे फोटोसेशन सुरू होते, तर काहींचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांच्या मागेपुढे फिरून उमेदवार अर्ज माघारी घेतल्याशिवाय बाहेर पडू नये, याची खबरदारी घेतली जात होती.
अर्ज माघारीची दोन दिवसांतील संख्या
प्रभाग १ (१०), प्रभाग २ (९), प्रभाग ३ (१६), प्रभाग ४ (१०), प्रभाग ५ (४), प्रभाग ६ (२३), प्रभाग ७ (१७), प्रभाग ८ (१५), प्रभाग ९ (१३), प्रभाग १० (१०), प्रभाग ११ (८), प्रभाग १२ (१२), प्रभाग १३ (१०), प्रभाग १४ (१७), प्रभाग १५ (१३), प्रभाग १६ (१०) अर्ज माघारीची दोन दिवसांतील संख्या प्रभाग १ (१०), प्रभाग २ (९), प्रभाग ३ (१६), प्रभाग ४ (१०), प्रभाग ५ (४), प्रभाग ६ (२३), प्रभाग ७ (१७), प्रभाग ८ (१५), प्रभाग ९ (१३), प्रभाग १० (१०), प्रभाग ११ (८), प्रभाग १२ (१२), प्रभाग १३ (१०), प्रभाग १४ (१७), प्रभाग १५ (१३), प्रभाग १६ (१०)