Uncertainty due to the coalition vote | युतीच्या मताधिक्यामुळे आघाडीत अस्वस्थता
युतीच्या मताधिक्यामुळे आघाडीत अस्वस्थता

- वैभव गायकर 

पनवेल : लोकसभा निवडणुकांनंतर देशात पुन्हा एकदा बहुमताने भाजप सरकार सत्तेवर आले आहे. या निकालांचा परिणाम विधानसभा निवडणुकांवरही होणार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात युतीच्या उमेदवाराला मिळालेली मते पाहता, या मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांनी राजकीय गणिते जुळवण्यास सुरुवात केली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल विधानसभा क्षेत्र सर्वात मोठे विधानसभा क्षेत्र आहे. या ठिकाणी युतीला मिळालेल्या मताधिक्यामुळे विरोधी पक्षांतही अस्वस्थता पसरली आहे. पनवेलमध्ये आतापर्यंत पार पडलेल्या निवडणुकांमध्ये शेकापने अटीतटीची लढत दिली आहे. मात्र, लोकसभा मतदारसंघात पनवेलमध्ये सुमारे ५४ हजारांची लीड पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत कोणती रणनीती आखावी, याबाबत आघाडीने विचारमंथन करण्याची गरज आहे. लोकसभेच्या निकालावरून देशात मोदीलाट अस्तित्वात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
देशभरातील मोदीलाटेचा विचार केल्यास, पनवेलमधून भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दृष्टीने ही निवडणूक नक्कीच सोपी झाली आहे. २०१४ रोजी त्यांना १ लाख २५ हजार १४१ मते मिळाली होती. केवळ १३,५०० मतांनी ते विजयी झाले होते. या वेळी शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना १ लाख ११ हजार ९२७, शिवसेनेच्या वासुदेव घरत यांना १७ हजार ९५३ मते मिळाली होती.
गेल्या पाच वर्षांत पनवेल विधानसभा मतदारक्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. शहरी मतदारांचा वाढलेला टक्का हा भाजपसाठी फायद्याचा ठरत आहे. दोन वर्षांपूर्वी पार पडलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता पनवेलकरांनी दिली.
>विधानसभेची वाट मित्रपक्षांसाठी बिकट
शेकापचे तालुक्यातील नेते भाजपच्या संपर्कात आहेत. यातच शेकापच्या दोन नगरसेविकांच्या पतीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या नगरसेविकादेखील कोणत्याही क्षणी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, त्यामुळे २०१९ ची विधानसभेची वाट शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेस या आघाडीतील मित्रपक्षांसाठी बिकट होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Uncertainty due to the coalition vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.