वाद शिंदे सेनेशी, अन् नाईकांच्या सोसायटीत उद्धवसेनेला 'नो एन्ट्री'; वनमंत्र्यांच्या भावाने रोखल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 10:26 IST2026-01-10T10:26:04+5:302026-01-10T10:26:56+5:30
Navi Mumbai Municipal Election 2026: नवी मुंबईतील कोपरखैरणेमध्ये शिवसेना (UBT) उमेदवार आणि ज्ञानेश्वर नाईक यांच्यात वाद. गणेश नाईकांच्या सोसायटीत प्रचारावरून संघर्ष. वाचा सविस्तर बातमी.

वाद शिंदे सेनेशी, अन् नाईकांच्या सोसायटीत उद्धवसेनेला 'नो एन्ट्री'; वनमंत्र्यांच्या भावाने रोखल्याचा आरोप
नवी मुंबई: ऐरोली विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धूर निघत असतानाच आता 'नाईक विरुद्ध ठाकरे' असा नवा वाद समोर आला आहे. कोपरखैरणे येथील 'बालाजी हाऊसिंग सोसायटी'मध्ये प्रचारासाठी गेलेल्या उद्धव सेनेच्या उमेदवारांना वनमंत्री गणेश नाईक यांचे बंधू ज्ञानेश्वर नाईक यांनी अडवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उद्धव सेनेचे उमेदवार राजेंद्र आव्हाड आणि कविता थोरात हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह बालाजी हाऊसिंग सोसायटीत प्रचारासाठी गेले होते. ही सोसायटी गणेश नाईक यांचे निवासस्थान म्हणून ओळखली जाते. ऐरोली जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे यांनी असा आरोप केला आहे की, "आमचे उमेदवार प्रचारासाठी गेले असता, ज्ञानेश्वर नाईक यांनी त्यांना आत येण्यापासून रोखले आणि लोकशाही अधिकाराचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला."
निवडणूक आयोगाकडे धाव घेणार
उद्धव सेनेने या प्रकाराचा तीव्र निषेध केला असून, याविरोधात पोलिसांत आणि निवडणूक आयोगाकडे रितसर तक्रार करणार असल्याचे प्रवीण म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे. "सोसायटीत प्रचार करणे हा उमेदवाराचा अधिकार आहे, तिथे कोणाचीही हुकूमशाही चालणार नाही," असा इशाराही त्यांनी दिला.
भाजपचे प्रत्युत्तर: "हे तर राजकीय कारस्थान"
दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ज्ञानेश्वर नाईक यांनी कोणालाही अडवलेले नसून, उद्धव सेनेच्या उमेदवारांनीच विनाकारण हुज्जत घातल्याचा दावा भाजपने केला आहे. "निवडणुकीच्या तोंडावर नाईक कुटुंबाला बदनाम करण्यासाठी रचलेले हे एक राजकीय कारस्थान आहे," असे प्रत्युत्तर भाजपकडून देण्यात आले आहे.