Navi Mumbai Municipal Corporation Result 2026: नवी मुंबईत भाजपचाच वरचष्मा; गणेश नाईकच शहराचे 'ठाणे'दार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 07:49 IST2026-01-17T07:49:35+5:302026-01-17T07:49:35+5:30
नाईकांनी भाजपच्या बळावर कधी नव्हे इतके निर्विवाद वर्चस्व मिळविले

Navi Mumbai Municipal Corporation Result 2026: नवी मुंबईत भाजपचाच वरचष्मा; गणेश नाईकच शहराचे 'ठाणे'दार
नवी मुंबई: पक्ष कोणताही असो, नवी मुंबई हा आपला बालेकिल्ला असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी १९९५ ते २०२६ पर्यतच्या सर्व निवडणुकांत दाखवून दिले आहे. यावेळी तर नाईकांनी भाजपच्या बळावर कधी नव्हे इतके निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. तिकीटवाटपात स्वपक्षाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या समर्थकांची तिकिटे कापून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाईकांना जी मोकळीक दिली होती, ती का दिली होती, हे या निकालाने दाखवून दिले आहे. नवी मुंबईतून गणेश नाईकांचा टांगा पलटी करूनच दाखवेल, या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेल्या आव्हानानंतर पेटून उठलेल्या गणेश नाईकांसह त्यांचे दोन्ही पुत्र संजीव नाईक व संदीप नाईक यांनी शहर अक्षरशः पिंजून आपणच नवी मुंबईचे 'ठाणे'दार असल्याचे दाखवून दिले आहे. निवडणूक प्रचारातही शिंदे-नाईक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी सुरू असल्याने ही लढत प्रतिष्ठेची बनली होती.
सर्वांना घेऊन जो चालतो, जनता त्याच्या पाठीशी...
नवी मुंबईत सर्वांना सोबत घेऊन चालणारे गणेश नाईकांचे राजकारणच चालते, इथे धनसंपत्ती वा बलप्रयोगाला थारा नाही, हे नवी मुंबईकरांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. ऐरोलीत अनंत सुतार, तुर्भेत अमृत मेढकर कुटूंबाचा झालेला पराभव आणि शिंदेसेनेचे विजय चौगुले यांचा विजय कशामुळे झाला, यासह आपल्या ऐरोली मतदारसंघात शिंदेसेनेने मुसंडी कशामुळे मारली याचा शोध विजयीरथ हाकणाऱ्या गणेश नाईकांना घ्यावा लागणार आहे.
भाजप ६५
शिंदेसेना ४२
काँग्रेस ०
राष्ट्रवादी अजित पवार ०
राष्ट्रवादी शरद पवार ०
उद्धवसेना २
मनसे १
वंचित
एमआयएम
इतर १