टांगा पलटी झाला, पण मंत्री गणेश नाईक यांच्या ऐरोलीमध्ये शिंदेसेनेनेही मारली जोरदार मुसंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 06:41 IST2026-01-17T06:40:29+5:302026-01-17T06:41:35+5:30
आक्रमक प्रचार भाजपसाठी ठरला लाभदायी; बेलापूरमधील घवघवीत यशानंतर आता श्रेयवादाची शक्यता

टांगा पलटी झाला, पण मंत्री गणेश नाईक यांच्या ऐरोलीमध्ये शिंदेसेनेनेही मारली जोरदार मुसंडी
नारायण जाधव
नवी मुंबई : येथील महापालिकेत सलग २० वर्षांपासूनची सत्ता वनमंत्री गणेश नाईक यांनी राखण्यात यश मिळविले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या खेपेला उद्धवसेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रमुख माजी नगरसेवक गळाला लावून गणेश नाईक यांना आव्हान दिले होते. निवडणुकीतील चुरस लक्षात घेऊन नाईक यांचा टांगा पलटी करून घोडे फरार करू, असे चॅलेंज शिंदेसेनेकडून दिल्यानंतर पेटून उठलेल्या नाईक यांनी तुम्ही मला हलक्यात घेऊ नका, मी तुमचा टांगा पलटी अन् घोडे फरारच नव्हे, तर घोडे बेपत्ता करेन, असे सांगून हे शहर अक्षरशः पिंजून काढले होते. त्याचा परिणामही दिसून आला. नाईक यांनी भाजपची एकहाती सत्ता आणली आहे. नाईक यांचे यश मोठे आहे, पण साम-दाम-दंड भेदाच्या राजकारणामुळे त्यांच्या हक्काच्या ऐरोली विधानसभा मतदारसंघांत शिंदेसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. त्याउलट नाईक यांच्या पक्षांतर्गत विरोधक असलेल्या आ. मंदा म्हात्रे यांच्या बेलापूर संघाने मात्र भाजपने दमदार यश मिळविले. यावरून येत्या काळात नाईक आणि म्हात्रे यांच्यात यश-श्रेयवाद रंगण्याची अपयशाचा शक्यता आहे.
ऐरोलीत प्रभाग क्र. १ ते तीन या हक्काच्या प्रभागात शिंदेसेनेने जोरदार मुसंडी मारुन नाईक यांचे अनंत सुतार, नवीन गवते, अपर्णा गवते हे मोहरे गारद केले. इकडे पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते रमाकांत म्हात्रे यांना पक्षात घेऊन त्यांच्या गोठिवली, तळवलीत त्यांचा मुलगा अनिकेत आणि उपमहापौर राहिलेल्या पत्नी मंदाकिनी यांच्या विजयासह घणसोली कॉलनीत माथाडी नेते ऋषिकांत शिंदे यांचे पुत्र सौरभ शिंदेंनी स्वबळावर शिंदेसेनेचे पॅनल निवडून आणले. या ठिकाणी राष्ट्रवादी (शरद पवार) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, भाजप नेते नरेंद्र पाटील या माथाडी नेत्यांनी बाळगलेले मौन शिंदेंना आणखी ताकद देऊन गेले. तिकडे वाशीत किशोर पाटकर तर तुर्भेत सुरेश कुलकर्णी यांनी एकट्याच्या जोरावर शिंदेसेनेचे पॅनल निवडून आणले आहेत. तुर्भेत मेढकर कुटुंबावर ठेवलेला फाजिल आत्मविश्वास नाईक यांना नडला आहे.
दरम्यान, पक्ष कोणताही असो सर्वधर्मीय, भाषिक नागरिकांशी असलेले गणेश नाईक यांचे गेल्या २५ वर्षांपासून सौहार्दाचे संबंध हे सुद्धा त्यांना यशाचा मार्ग दाखविणारे ठरेले आहे.
या भागाने तारले
जय-पराजयाच्या राजकारणात रबाळे, पावणे, कोपरखैरणे, वाशी विभागांसह बेलापुरातील सानपाडा, जुईनगर, नेरुळ आणि बेलापूर विभागाने नाईक यांना मोठे बळ दिले. या परिसरात त्यांचे पुत्र संजीव नाईक, संदीप नाईक यांनी जीवाचे रान करून जी मेहनत घेतली. संदीप नाईक यांचे सूक्ष्म नियोजन आणि बेलापूरमध्ये आ. मंदा म्हाजेंनी प्रचारात घेतलेला सहभागही कामी आला आहे.
नवी मुंबई सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने मिळवलेला विजय हा जनतेच्या विश्वासाचा, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या विचारांचा सन्मान आहे. नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. लोकप्रतिनिधींना आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल- गणेश नाईक, वनमंत्री