नवी मुंबईत पुन्हा एकदा ‘गणेश पर्वा’ला प्रारंभ
By नारायण जाधव | Updated: January 19, 2026 08:56 IST2026-01-19T08:56:54+5:302026-01-19T08:56:54+5:30
१९९५ पासून पहिल्यांदाच पालिकेत भाजपची सत्ता आल्याने मुख्यमंत्री फडणवीस नाईकांवर खूश आहेत

नवी मुंबईत पुन्हा एकदा ‘गणेश पर्वा’ला प्रारंभ
नारायण जाधव
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पक्ष कोणताही असो, सतत २० वर्षे नवी मुंबईकरांनी गणेश नाईक यांच्यावर विश्वास दाखविला आहे. यावेळी तर १११ पैकी ६५ नगरसेवक निवडून एकहाती सत्ता सोपविली आहे. यापूर्वी सत्तासोपानावर आरूढ होण्यासाठी नाईकांना इतरांच्या कुबड्यांची गरज भासत होती. कधी काँग्रेस तर कधी अपक्षांची मदत घेऊन आपणच नवी मुंबईचे दादा आहोत, हे त्यांनी सिद्ध केले आहे. या निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईचे कसे नुकसान केले, हा मुद्दा त्यांनी प्रचारात मांडला. सत्ता पुन्हा हाती दिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून आपण हे सर्व थांबवू, असे आश्वासन दिले. ते लोकांना भावले. आता एकहाती सत्ता आल्याने महापालिकाच नव्हे तर सिडकोसह एमआयडीसीत नाईक काय करतात याकडे शहरवासीयांचे लक्ष असेल.
एकनाथ शिंदेंविरोधात अचानक आक्रमक पवित्रा का घेतला, हे वनमंत्री नाईकांनी प्रचारात सांगितले होते. पाच वर्षांपासून नवी मुंबईत प्रशासकीय राजवट आहे. त्या आधी नाईक सत्तेबाहेर असल्याने या महापालिकेवर आधी नगरविकासमंत्री, नंतर मुख्यमंंत्री आणि पुन्हा नगरविकासमंत्री म्हणून शिंदेंनी हुकूमत गाजविली. यातूनच मर्जीतील अधिकारी प्रतिनियुक्तीवर आणून पात्रता नसताना हवा तो पदभार देऊन त्यांच्याकडून पाहिजे तशी कामे करवून घेणे, नको त्या कामांची कंत्राटे काढणे, नगररचना खात्याकडून पाहिजे तसे निर्णय घेऊन बिल्डरांचे चांगभलं करणे, नवी मुंबईचे पाणी इतरांना देणे, आरक्षित भूखंड सिडको आणि एमआयडीसीकडून विकणे असे आरोपही त्यांनी केले. महापालिकेत भाजपची सत्ता असताना आणि आमदार असतानाही अधिकारी नाईकांना जुमानत नव्हते. यातूनच मग नाईक आणि शिंदेंमधील दरी वाढली.
आता नाईक मंत्री आहेत. महापालिकेत पुन्हा त्यांची सत्ता आली आहे. निर्णयाच्या चाव्या महासभेच्या हाती गेल्या आहेत. यामुळे नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे अथवा आयुक्तांना आता महासभेच्या मंजुरीशिवाय निर्णय घेता येणार नाहीत. निवडणूक प्रचारात नाईक यांनी आक्रमकपणे प्रचार केला. नगरविकास मंत्री या नात्याने शिंदेंनी यूडीसीपीआरमध्ये बिल्डरधार्जिणे बदल केलेे, आयएएस अधिकाऱ्यांनी त्यांना मदत केली, कोणी दलाली खाल्ली असे बेछूट आरोप केले.
महापालिकेत सत्ता आल्यास आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून शहरांना भकास करणारे यूडीसीपीआरमध्ये केलेले बिल्डरधार्जिणे बदल थांबवू, प्रशासकीय राजवटीतील निर्णयांचे ऑडिट करण्यासह ईडीमार्फत चौकशी करू असे आश्वासन दिले होते. ते पूर्ण होण्याचे संकेत भाजपच्या पहिल्याच विजयी मेळाव्यात मिळाले आहेत. १९९५ पासून पहिल्यांदाच पालिकेत भाजपची सत्ता आल्याने मुख्यमंत्री फडणवीस नाईकांवर खूश आहेत. यूडीसीपीआरबाबत नाईक यांचे म्हणणे खरे असून मी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेईन व शहर विकासासाठी त्यात योग्य बदल केले जातील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितल्याने महापालिकेच्या नगररचनाकारांसह इतरांचे धाबे दणाणले आहेत. आगामी काळात नवी मुंबईत ‘भाई’गिरी कमी होऊन ‘दादा’गिरी चालेल असे दिसते.