नाईक - शिंदे संघर्ष पोहोचला टिपेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 12:23 IST2026-01-12T12:23:39+5:302026-01-12T12:23:39+5:30
मंत्रिमंडळात एकत्र काम करणारे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष सुरू आहे.

नाईक - शिंदे संघर्ष पोहोचला टिपेला
नामदेव मोरे
नवी मुंबईची सत्ता मिळविण्यासाठी शिंदेसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच आहे. मंत्रिमंडळात एकत्र काम करणारे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष सुरू आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात, "टांगा पलटी व घोडे फरारच नव्हे, तर बेपत्ता करू", असा इशारा त्यांनी एकमेकांना दिला आहे.
निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीपासूनच राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या भाजप आणि शिंदेंसेनेने नवी मुंबईत स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली होती. औपचारिकता म्हणून युतीसाठी बैठका घेतल्या, पण जागावाटपात एकमत झाले नसल्याचे कारण देऊन अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी युती तुटल्याचे जाहीर केले. सर्व १११ जागांवर दोन्ही पक्षांनी उमेदवारी अर्ज भरले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ऐरोली आणि बेलापूरमध्ये एक दिवस प्रचारफेरी काढून प्रभाग पिंजून काढले. नाईक यांनी, धोकादायक इमारतींची पुनर्बाधणी, प्रकल्पग्रस्त, एसआरए, कंडोनियम अंतर्गत प्रश्न रखडविले होते ते सोडविल्याचा दावाही केला.
भाजपने सर्व अधिकार नाईक यांना दिले. त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. नवी मुंबईच्या वाट्याचे पाणी पळविले, सामाजिक सुविधांचे भूखंड बिल्डरांच्या घशात घातले. हिंमत असेल तर लोकसभा आणि विधानसभाही स्वबळावर लढवा, माझ्या नादी लागल्यास तुमचा टांगा पलटी करून घोडे फरार नव्हे, तर बेपत्ता करू, असा इशाराही त्यांनी दिला. शिंदेसेनेनेही नाईक यांच्यावर भूखंड लाटल्याचे आरोप करून (बावखळेश्वर आणि रेतीबंदर येथील ग्लास हाउसच्या भूखंडांची आठवण करून दिली. शहर हिताची कामे रखडविण्याचाही आरोप केला. "आमच्यामुळे तुम्ही मंत्री आहात, आम्हीच तुमचा टांगा पलटी करून परिवर्तन घडवू", असा इशारा दुसरे मंत्री शंभुराज देसाईनी नाईकांना दिला. शेवटच्या टप्प्यात सुरु झालेल्या आरोप-प्रत्यारोपाने शिंदेसेना आणि भाजपमधील सत्तेसाठीची रस्सीखेच वाढली आहे
मंदा म्हात्रेंची नाराजी आणि प्रचार
मंदा म्हात्रे यांच्या सर्व समर्थकांना तिकीट नाकारण्यात आले. त्यांना सह्या नसलेले १३ एबी फॉर्म देऊन वाटाण्याच्या अक्षता लावल्याने त्यांनी थेट गणेश नाईक यांच्यावर टीका करून खळबळ उडवून दिली. त्यांच्या मुलानेही तिकीट नाकारले. त्यांच्या नाराजीचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना शेवटच्या टप्प्यात म्हाजेंनी प्रचारात सहभागी होऊन ठिकठिकाणी बैठका घेतल्या.
महाविकास आघाडीतही ज्याचा त्याचा सवतासुभा
जागावाटपावरून महाविकास आघाडीतही बिघाडी झाली. मनसे आणि उद्धवसेना एकत्र लढत असून, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेससह राष्ट्रवादी (अजित पवार) आणि इतर पक्षही स्वतंत्र लढत आहेत. या सर्व पक्षांनी सभांऐवजी घरोघरी करण्यावर भर दिला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे यांनी तसेच रोहित पवार यांनी प्रचार केला. उद्धवसेनेचे भास्कर जाधव यांनीही सभा घेतल्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कोणी फिरकलेले नाही.