गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 08:44 IST2025-08-23T08:43:27+5:302025-08-23T08:44:12+5:30

वाहन दुरुस्तीची व्यवस्था, अल्कोहोल चाचणीही होणार

Facilitation centers for Ganesh devotees every 15 kilometers on the national highway | गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र

गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणातील जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. यात राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र उभारणार आहेत तर २३ ठिकाणी रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. यंदा अपघात टाळण्यासाठी युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याचा आणि वेगरोधक फलक लावण्यावर लक्ष देणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे अपर महासंचालक प्रवीण साळुंखे यांनी दिली.

नवी मुंबईत झालेल्या गणेशोत्सव समन्वय समितीच्या बैठकीत २७ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या उत्सवासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला रायगड महामार्ग पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, नवी मुंबई पोलिस उपायुक्त तिरूपती काकडे, रस्ते विकास महामंडळ आणि परिवहन विभागातील अनेक अधिकारी उपस्थित होते. चाकरमानी मोठ्या संख्येने गावी जात असल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता गृहित धरून रस्ते विकास महामंडळाने संबंधित मार्गावर सूचना फलक, रम्बलर आणि गतिरोधक फलक लावले आहेत.

वाहन दुरुस्तीची व्यवस्था

राष्ट्रीय महामार्गावरील सुविधा केंद्रांमध्ये पोलिस मदत कक्ष, आरोग्य सुविधा, प्रसाधनगृह, चहा-पाण्याची व्यवस्था तसेच स्तनदा मातांसाठी स्वतंत्र कक्ष प्रदान केला जाईल. याशिवाय वाहन दुरुस्तीसाठीदेखील व्यवस्था केली आहे.

अल्कोहोल चाचणी

२३ ते २७ ऑगस्ट दरम्यान ५ हजार बसची व्यवस्था केली आहे, असे परिवहन विभागाच्या प्रतिनिधींनी बैठकीत सांगितले. माणगाव आणि इंदापूर डेपो परिसरात वाहतुकीची कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: Facilitation centers for Ganesh devotees every 15 kilometers on the national highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.