भाजपा नगरसेविकेच्या पदास १२ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती, नवी मुंबईतील प्रकरण काय आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 20:42 IST2026-02-05T20:41:26+5:302026-02-05T20:42:49+5:30
ऐन महापौर निवडणूक जवळ आलेली असताना न्यायालयाने भाजपा नगरसेविकेच्या पदाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांना महापौर पदाच्या निवडणुकीत मतदान करता येणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भाजपा नगरसेविकेच्या पदास १२ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती, नवी मुंबईतील प्रकरण काय आहे?
Navi Mumbai Municipal Election 2026 : नेरूळ प्रभाग २३ 'ब'मधून निवडून आलेल्या रूपाली यांच्याविरोधात शिंदेसेनेच्या भगत अश्विनी माने यांनी बेलापूर न्यायालयात दाखल केली होती. याचिका भाजप उमेदवारावर अनधिकृत बांधकामाचा आक्षेप घेतला होता.
न्यायालयाने भगत यांच्या पदास १२ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. यामुळे त्यांना महापौर निवडीच्या मतदानापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.
निवडणूक निकालानंतर शिंदेसेनेच्या अश्विनी माने यांनी न्यायालयात धाव घेतली होती. प्रभाग २३ 'ब'मधून निवडून आलेल्या रूपाली किस्मत भगत यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करताना बांधकामाविषयी अनधिकृत माहिती लपवल्याविषयी आक्षेप घेतला आहे.
१२ फेब्रुवारीपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश
बेलापूर न्यायालयाने ही याचिका दाखल केली असून भगत यांना १२ फेब्रुवारीपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
तोपर्यंत त्यांच्या निवडीला स्थगिती राहणार आहे. हा भाजपला धक्का समजला जात असून महापौर निवडीच्या वेळी एक मत कमी होणार आहे. निवडणूक निकालानंतर दाखल झालेल्या याचिकेवर पुढील सुनावणीमध्ये काय होणार याविषयीही आता उत्सुकता निर्माण झाली आहे.
महापौर निवडीकडे सगळ्यांचे लक्ष
महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचे ६५ नगरसेवक निवडून आले आहेत. १ अपक्षाने पाठिंबा दिल्यामुळे त्यांचे संख्याबळ ६६ झाले आहे.
न्यायालयाने तात्पुर स्थगिती दिल्यामुळे ५ फेब्रुवारीच्या सभेत पुन्हा संख्याबळ एकने कमी झाले आहे.
भाजपविरोधात शिंदेसेनेकडे ४२ नगरसेवक आहेत. मनसेचा १, उद्धवसेनेचे २ असे विरोधातील संख्याबळ ४५ आहे.