अयोध्येत लोकांना 'सायकल' हवी 'कमळ' नको, असं का? भाजपा उमेदवाराचा पराभव कशामुळे झाला?

By Meghana.dhoke | Published: June 5, 2024 08:23 PM2024-06-05T20:23:01+5:302024-06-05T21:01:00+5:30

अयोध्येत भाजपा उमेदवाराचा पराभव होण्याची ७ कारणं; अयोध्यावासी म्हणतात - ‘ विकास का डर’ है क्यों की..(Why did the BJP lose in Ayodhya?)

Why did the BJP lose in Ayodhya Loksabha election 2024 ? 7 reasons | अयोध्येत लोकांना 'सायकल' हवी 'कमळ' नको, असं का? भाजपा उमेदवाराचा पराभव कशामुळे झाला?

अयोध्येत लोकांना 'सायकल' हवी 'कमळ' नको, असं का? भाजपा उमेदवाराचा पराभव कशामुळे झाला?

मेघना ढोके

अयोध्येत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि अयोध्येत राहणाऱ्यांचे भयंकर ट्रोलिंग सोशल मीडियात सुरू झाले. विकास करुनही अयोध्येतल्या लोकांनी दगाबाजी केली असा आरोप होऊ लागला. पण अयोध्येत राहणाऱ्यांशी बोललं तर ते सांगतात ‘विकास से ही डर लगता है’! ये विकास अतिशयोक्ती देख कर डर लगता है!’ अयोध्येत विकासाचा धबधबा वाहू लागला, देशभरातून व्हीआयपी पोहचले पण स्थानिक माणसांना मात्र चिंता की सांड अर्थात मोकाट गावभर फिरणारे वळू तर आपल्याला मारुन जाणार नाहीत? त्यावर कुणाकडे उत्तर नाही. रामललाचं मंदिर झालं, चकाचक इंग्रजी बोलणाऱ्या बाहेरच्या  स्मार्ट मुलांना कामं मिळू लागली पण स्थानिक हिंदी मिडिअमवाल्यांचे हात मात्र रिकामेच. विकासकामांच्या वाटेत आलेली घरं-दुकानं गेली त्याची नुकसानभरपाई अजून मिळालेली नाही, दावे निकाली निघत नाही, प्रशासन ऐकत नाही. स्थानिक खासदार काही बोलत नव्हते. विकास सुविधा बाहेरच्यांसाठी पण आमचं काय, या त्यांच्या असंतोषाकडे कुणीच लक्ष दिलं नाही. शेवटी त्यांनी ठरवलं 'कमळ' नको, 'सायकल' चालवून पाहू..

अयोध्येत भाजपा उमेदवार अपयशी ठरण्याची कारणे

१. अयोध्येत भाजपा उमेदवार हरला असे म्हणताना हे लक्षात घ्यायला हवे की अयोध्या आणि फैजाबाद ही दोन जुळी शहरं आहेत. एकमेकांना लागून आहेत. फैजाबाद लोकसभा मतदारसंघात ५ विधानसभा मतदारसंघ आहेत. अयोध्या, बिकापूर, मिल्कीपूर, रुदौली, दरियाबाद. या पाच विधानसभा मतदारसंघांनी मिळून खासदार निवडला जातो. लल्लू सिंह हे भाजपा उमेदवार २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुका याच मतदारसंघातून निवडून आले होते. तिसऱ्यांदा खासदाकरीची निवडणूक लढवत होते. ते ठाकूर (उच्चवर्णीय) असून त्यांच्या विरोधात समाजवादी पक्षाचे मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अवधेश प्रसाद निवडणूक लढवत होते. ते पासी या मागासवर्गीय जातीचे. स्थानिक, मागासवर्गीय, लोकप्रिय उमेदवार निवडणं हा समाजवादी पक्षाचा निर्णय भाजपाच्या विरोधात गेला. कारण जातीय समीकरणं बदलली.

२. लल्लू सिंह १९९१, १९९३, १९९६, २००२, २००७ असे पाचवेळा अयोध्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. २०१४ आणि २०१९ मध्ये ते फैजाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. त्यांच्याविषयी स्थानिकांत प्रचंड नाराजी होती. स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी उमेदवार बदलाची मागणी केली होती, जी भाजपा नेतृत्वाने मान्य केली नाही. लल्लू सिंह ‘बहौत घमंडी है’ असा एक समज या मतदारसंघात सर्वदूर गेले काही दिवस झालेला होता. कारण ते लोकांसाठी उपलब्ध नसत. त्यात अयोध्येतील विकासकामांनी वेग घेतला तेव्हा विमानतळासाठी भूसंपादन, रामपथ, चौदा कोसी परिक्रमा मार्ग, रस्ते रुंदीकरण, अनेकांची घरे त्यात गेली यावेळी आपले खासदार आपल्यासाठी मदतीला उपलब्ध नाहीत, ते प्रशासनासमोर आपली बाजू जोरकस मांडत नाहीत असा आक्षेप वारंवार नोंदवला गेला. त्यातून स्थानिकांमध्ये त्यांच्याविषयी तीव्र नाराजी होती.

३. ‘विकास की अतिशयोक्ती’ आणि ‘विकास का डर’ या दोन संकल्पना अयोेध्या शहरातील नागरिकांच्या बोलण्यात वारंवार येतात. याचं कारण म्हणजे विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या, त्या भूसंपादनानंतर त्यांचे दावे नीट मार्गी लागले नाहीत. अनेकांना पैसे वेळच्या वेळी मिळाले नाही, कुणाला कमी मिळाले, कुणाचे झगडे अजून सुरुच आहेत. तेच रामपथ निर्माण कामात ज्यांची दुकानं, घरं गेली त्यांचे अजून पुर्नवसन झाले नाही. नुकसानभरपाई मिळाली नाही. ज्यांना दुसरीकडे दुकानं द्यायचे वायदे केले ते अजून पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे विकासकामाची कुऱ्हाड कधीही आपल्या घरावर, दुकानावर, जमिनीवर पडेल अशी भीती स्थानिकांना वाटू लागली. आपलं काही खरं नाही या असुरक्षिततेनं अनेकांना पोखरले. बाहेरून आलेल्या पर्यटक / तीर्थयात्रींसाठी सोयी होत असताना स्थानिकांना काहीच लाभ मिळत नाही ही उपेक्षेची भावना स्थानिकांच्या मनात घर करून होती.

४. अयोध्या शहरात प्रचंड विकासकामं दिसत असली तर ग्रामीण भागात अजूनही विकास त्या प्रमाणात पोहचला नाही. प्रधानमंत्री आवास योजना, शौचालयं, रस्ते ही कामं चांगली झाली. मात्र पाणी प्रश्न अजूनही अनेक गावांत गंभीर आहेच. त्या ग्रामीण नाराजीचा फटकाही लल्लू सिंह यांना बसला. ‘दस साल में महिलाओके लिए कुछ नहीं किये’ ही महिलांची त्यांच्याविषयी तक्रार आणि नाराजी आहेच.

५. लल्लू सिंह प्रचार करताना म्हणाले की भाजपाला ४०० जागा हव्या, तर आम्ही संविधान बदलू. मिल्कीपूरमध्येच त्यांनी हे विधान केले. त्याच मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अवधेश प्रसाद त्यांचे प्रतिस्पर्धी. तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. समाजवादी पक्षाचे उमेदवार आणि नेते यांनी त्याचा जोरदार प्रचार केला. हा मुद्दा सर्वस्वी त्यांच्या विरोधात गेला. अवधेश प्रसाद पासी या मागासवर्गीय जातीचे. ६ वेळा आमदार. दलित आणि ओबीसींची मतं मिळायला या मुद्द्यामुळे त्यांना मदत झाली. मुस्लिम मतदान भाजपाच्या विरोधात गेले. हे लल्लू सिंह हरण्याचे प्रमुख कारण ठरले. अवधेश प्रसाद यांना ४८. ५० टक्के तर लल्लू सिंह यांना ४३.८१ टक्के मतं पडली. याचा अर्थ भाजपाचा पारंपरिक मतदार किंवा मोदी समर्थक मतदारांनी त्यांना मतं दिली, मात्र गणित चुकवले ते अवधेश प्रसाद यांच्या जोरदार प्रचाराने आणि बसपाचा उमदेवार कमकुवत ठरल्याने.

६. उत्तर प्रदेशात तरुण मुलांमध्ये बेरोजगारी आणि पेपर लिक प्रकरणामुळे सर्वदूर नाराजी होती ती अयोध्येतही दिसली. त्याचा फटका फैजाबाद मतदारसंघातही भाजपा उमेदवाराला बसला. या भागात अजूनही मोठे उद्योगधंदे नाही, अनेकांचे पोट तुटपुंज्या शेतीवर आहे. वाढलेल्या पर्यटनाचे फायदे अजून सर्वांपर्यंत पोहोचलेले नाहीत. त्यातच बाहेरून आलेल्यांना रोजगार आपल्यापेक्षा लवकर मिळतो अशी काही तरुणांची धारणा आहे.

७. अयोेध्येच्या विकासकामात स्थानिक माणसांचा सहभाग कमी आणि प्रशासनाचा, त्यातही इंग्रजी बोलणाऱ्या बाहेरून आलेल्या अनेकांचा वरचष्मा अधिक. स्थानिक तमाम मागास असा स्थानिकांना कमी लेखण्याचा सूर या भागात विकासकामांसह वाढला. नुकसानभरपाई दावे, रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गायी गुरांमुळे होणारे अपघात, स्थानिकांच्या भाषेत सांड का प्रकोप, रोजगार हे सारे मुद्दे नाराजी वाढवणारे होते. नव्या चकचकाटात आपल्याला काहीच स्थान नाही असा भाव स्थानिकांच्या मनात निर्माण झाल्यानेही असंतोष वाढलेला होता. आणि स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी तो आपल्या पक्षधुरीणांना सांगूनही त्याचा त्यांना अंदाज आला नाही आणि शेवटी फैजाबादमध्ये हार पत्करावी लागली.

विकास बाहेरच्यांना दाखवायला, आमच्या प्रश्नांचं काय असा सवाल फैजाबाद मतदारसंघच नाही तर अयोध्या शहरातही लोक करतात.

Web Title: Why did the BJP lose in Ayodhya Loksabha election 2024 ? 7 reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.