हरयाणाच्या रणांगणात ‘दंगल’ कोण जिंकणार? भाजपपुढे पुनरावृत्तीचे आव्हान; काँग्रेस पक्षाला मुसंडी मारण्याची संधी

By राकेशजोशी | Published: May 25, 2024 01:11 PM2024-05-25T13:11:49+5:302024-05-25T13:12:33+5:30

राज्यात १० जागांवर १६ महिलांसह एकूण २२३ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. २५ मे रोजी मतदान होणाऱ्या या राज्याची ‘दंगल’ कोण जिंकणार, कोणत्या पक्षाची सरशी होणार हे ४ जून रोजी कळेल.

Who will win Haryana's battlefield A repeat challenge to the BJP; An opportunity for the Congress party to win | हरयाणाच्या रणांगणात ‘दंगल’ कोण जिंकणार? भाजपपुढे पुनरावृत्तीचे आव्हान; काँग्रेस पक्षाला मुसंडी मारण्याची संधी

हरयाणाच्या रणांगणात ‘दंगल’ कोण जिंकणार? भाजपपुढे पुनरावृत्तीचे आव्हान; काँग्रेस पक्षाला मुसंडी मारण्याची संधी

चंडीगड : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हरयाणात घडलेल्या राजकीय उलथापालथी, प्रचारावेळी अनेक ठिकाणी झालेला विरोध पाहता यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला २०१९ प्रमाणे विजयाची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाला मुसंडी मारण्याची संधी आहे. जननायक जनता पक्ष (जेजेपी)ही रिंगणात आहे. राज्यात १० जागांवर १६ महिलांसह एकूण २२३ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. २५ मे रोजी मतदान होणाऱ्या या राज्याची ‘दंगल’ कोण जिंकणार, कोणत्या पक्षाची सरशी होणार हे ४ जून रोजी कळेल.

२०१९ च्या निवडणुकीत भाजपने सर्वच्या सर्व १० जागा जिंकल्या होत्या. निवडणुका जाहीर झाल्यापासून भाजपापुढे आव्हानांचा डोंगर कायम राहिला. शेतकरी आंदोलनाची हाताळणी, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या कुस्तीपटूंच्या मुद्द्यावरून निर्माण झालेले वादळ, निवडणूक तोंडावर आली असताना मनोहरलाल खट्टर यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा अशा गर्तेत अडकलेल्या भाजपला गेल्या निवडणुकीसारखी कामगिरी यंदाही करता येईल का, याचीच उत्सुकता आहे. 

जातीय समीकरण महत्त्वाचे
२०१९ च्या निवडणुकीत गैर-जाट सवर्णांची ७४ टक्के मते भाजपला गेली. काँग्रेसला १८ टक्के मते मिळाली. ५० टक्के जाट मतदारांनी भाजपला आणि ३३ टक्के काँग्रेसला मतदान केले. मुस्लीम मतांबद्दल बोलायचे झाले तर या समाजाची १४ टक्के मते भाजपकडे गेली.

‘जेजेपी’ आणि ‘आयएनएलडी’च्या कामगिरीकडे लक्ष
nहरयाणा एक असे राज्य आहे जिथे २०१४ नंतरच भाजप विधानसभा आणि लोकसभेच्या जागांवर मजबूत स्थितीत आला; परंतु काळाच्या ओघात परिस्थिती बदलली आहे. शेतकरी आंदोलन हे त्याचे सर्वांत मोठे उदाहरण आहे.
nत्यामुळे जननायक जनता पार्टी आणि भारतीय राष्ट्रीय लोक दल निवडणुकीत नेमकी कोणती भूमिका बजावतात हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

या विषयांवर होतेय निवडणूक
यावेळची निवडणूक अनेक अंगांनी बदलली आहे. शेतकरी आंदोलन, अग्निवीर योजनेला विरोध, याचे परिणाम निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे. तरुणांच्या संतापाचे मतांमध्ये रूपांतर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. 
हरयाणात काँग्रेस आणि आप यांची युती आहे. आप कुरुक्षेत्रामधून नशीब आजमावित आहे. अनेक जागांवर काँग्रेस भाजपला टक्कर देण्याच्या प्रयत्नात आहे. 
रोहतक, सिरसा आणि सोनिपतमध्ये भाजप नेत्यांना घाम गाळावा लागत आहे. कर्नाल, गुरुग्राम आणि फरिदाबाद या जागा काँग्रेससाठी आव्हानात्मक आहेत. अंबाला, हिसार, भिवानी-महेंद्रगड येथे चुरशीच्या लढतीची अपेक्षा आहे.

 

Web Title: Who will win Haryana's battlefield A repeat challenge to the BJP; An opportunity for the Congress party to win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.