Viral Video : महिलेच्या आक्रस्ताळपणाचा व्हिडिओ व्हायरल, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 21:01 IST2022-01-11T20:57:13+5:302022-01-11T21:01:29+5:30
सोशल मीडियावर संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलेनं माफी मागत फळविक्रेत्याची नुकसान भरपाई केली आहे. अयोध्या नगर परिसरातील हा व्हिडिओ असल्याचे सांगण्या येते.

Viral Video : महिलेच्या आक्रस्ताळपणाचा व्हिडिओ व्हायरल, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल
भोपाळ - सोशल मीडियावर एका फळविक्रेत्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, एका महिला फळविक्रेत्याच्या गाडीवरील फळे जमिनीवर फेकून देताना दिसून येते. संबंधित महिलेच्या घराबाहेर असलेल्या कारला या फळविक्रेत्याची गाडी थोडी खरचटली होती. त्यामुळे, या महिलेनं संताप व्यक्त करत गरीब विक्रेत्याच्या गाड्यावरील फळे खाली फेकून दिली आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून जिल्हाधिकाऱ्यांनीही याची दखल घेतली आहे.
सोशल मीडियावर संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलेनं माफी मागत फळविक्रेत्याची नुकसान भरपाई केली आहे. अयोध्या नगर परिसरातील हा व्हिडिओ असल्याचे सांगण्या येते. मिळालेल्या माहितीनुसार, एमपी 04 सीएच 4957 नंबरची कार एका घराबाहेर उभी होती. त्याचवेळी, फळविक्रेता तेथून जात असताना त्याच्या गाडीचा हलकासा धक्का कारला लागला. हे पाहताच समोरील घरातून एक महिला गाड्याजवळ आली आणि तिने फळविक्रेत्याची फळे जमिनीवर फेकायला सुरुवात केली. शेजारील एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ काढला होता. त्यानंतर, तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.
दरम्यान पीडित व्यक्तीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. चित्रलेखा तिवारी असं या महिलेचं नाव असून त्या एका महाविद्यालयात प्राध्यापक असल्याचे समजते. प्रशासनाने दखल घेताच महिलेनं माफी मागत फळविक्रेत्याचे नुकसान भरुन दिले. विशेष म्हणजे, भोपाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही ट्विट करुन या व्हिडिओवरील संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यात येत असून कारवाई केली जाईल, असे म्हटले होते.