कॉपीसाठी कपडे उतरवले, विद्यार्थिनीने पेटवून घेतले; अपमान सहन न झाल्याने उचलले पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 08:20 IST2022-10-16T08:19:17+5:302022-10-16T08:20:48+5:30
कॉपी करत असल्याच्या संशयावरून शिक्षिकेने नववीच्या एका विद्यार्थिनीचे कपडे काढून झडती घेतली.

कॉपीसाठी कपडे उतरवले, विद्यार्थिनीने पेटवून घेतले; अपमान सहन न झाल्याने उचलले पाऊल
जमशेदपूर: कॉपी करत असल्याच्या संशयावरून शिक्षिकेने नववीच्या एका विद्यार्थिनीचे कपडे काढून झडती घेतली. विद्यार्थिनी हा अपमान सहन करू शकली नाही व घरी येताच तिने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. आगीच्या ज्वाळांनी वेढलेली विद्यार्थिनी घरातून रस्त्यावर आली आणि बेशुद्ध होऊन कोसळली. लोकांनी पाणी टाकून आग विझवली व नंतर तिला रुग्णालयात नेले. जमशेदपूरच्या छायानगर भागात ही हृदयद्रावक घटना घडली.
जवळपास ९५ टक्के भाजल्याने तिला टाटा मेन हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले आहे. तिची प्रकृती गंभीर आहे. आई, भाऊ आणि कुटुंबातील अन्य सदस्यांनी शिक्षिकेवर कारवाईची मागणी केली आहे. दुसरीकडे आरोपी शिक्षिका चंद्रा दास यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. मी विद्यार्थिनीला मारहाण केली नाही तसेच तिचे कपडेही काढले नाहीत. कॉपी करताना पकडल्यानंतर तिने कपड्यात कॉपी लपविल्याचे अन्य विद्यार्थिनींनी सांगितले हाेते. (वृत्तसंस्था)
मुलीने केलेले आरोप
दुपारी चार वाजता पर्यवेक्षिका चंद्रा दास यांनी मला कॉपी करताना पकडले. त्यांनी मला सर्वांसमोर चापट मारली व सर्वांसमोर मला कपडे काढायला सांगितले. मी विरोध केला तेव्हा जास्त हुशार झाली का, असे म्हणत माझे कपडे काढले, असे पीडित विद्यार्थिनीने सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"