पश्चिम बंगालमध्ये साॅफ्ट हिंदुत्व V/s हार्ड हिंदुत्व : कुणाचा ‘खेला होबे’?

By योगेश पांडे | Published: April 12, 2024 06:00 AM2024-04-12T06:00:19+5:302024-04-12T06:00:28+5:30

‘नंबर एक’साठी भाजप - तृणमूल आमनेसामने, ‘सीएए’मुळे कोणाला फायदा?

Soft Hindutva V/s Hard Hindutva in West Bengal: Whose 'Khela Hobe'? | पश्चिम बंगालमध्ये साॅफ्ट हिंदुत्व V/s हार्ड हिंदुत्व : कुणाचा ‘खेला होबे’?

पश्चिम बंगालमध्ये साॅफ्ट हिंदुत्व V/s हार्ड हिंदुत्व : कुणाचा ‘खेला होबे’?

योगेश पांडे

कोलकाता : लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वांत जास्त चुरस पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळत आहे. इंडिया आघाडीत जागांबाबत चर्चा सुरू होणार असताना सर्व उमेदवार जाहीर करणाऱ्या तृणमूलच्या अध्यक्षा व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत झाली आहे, तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये क्रमांक एकचा पक्ष बनण्यासाठी भाजपचा तळागाळात प्रचारावर भर आहे. दुसरीकडे, डाव्या पक्षांकडून अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे काही जागांवर तिरंगी, तर बहुतांश जागांवर थेट भाजप विरूद्ध तृणमूल असाच सामना राहणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा आहेत. तेथे मुस्लिम मतदारांची भूमिका निर्णायक ठरते. धार्मिक व जातीय समीकरणे लक्षात घेता ‘सीएए’ हा एक मोठा मुद्दा ठरणार आहे. केंद्र सरकारने ‘सीएए’ लागू केल्यामुळे भाजपकडून या मुद्द्यावर तळागाळात प्रचार करण्यात येत आहे. तृणमूलने सीएएविरोधात भूमिका घेत मुस्लिम मतदारांची मते निश्चित करण्याचे नियोजन केले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या हाेत्या.

२०१९ मधील स्थिती
पक्ष    जागा    मतांची टक्केवारी
तृणमूल काँग्रेस    २२    ४३.३०%
भाजप    १८    ४०.७०%
काँग्रेस    २    ५.६७%

संदेशखालीवरून भाजप आक्रमक
२०१९च्या निवडणुकीत भाजपने दोन जागांवरून थेट १८ जागांवर या राज्यात विजय मिळविला होता, तर तृणमूलची १२ जागांवर पीछेहाट झाली होती. यंदा भाजपने ‘नंबर एक’साठी जोर लावला आहे. संदेशखाली महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून बुद्धिजिवींमध्येही भाजपचा प्रचार सुरू आहे. भाजपने जस्टीस अभिजीत गांगुली यांना उमेदवारी देत सुशिक्षित मतदारांपर्यंत वेगळा संदेश दिला आहे.

दिल्लीतील वजन वाढविण्याची ममतांना संधी
मागील काही काळापासून ममता बॅनर्जी यांचा विरोध केंद्राची डोकेदुखी बनला आहे. पश्चिम बंगालमध्ये तीसहून अधिक जागा जिंकल्यास त्यांचे दिल्लीतील वजन निश्चितपणे वाढेल.
राज्यात जवळपास २७ टक्के मुस्लिम आहेत. तृणमूलने सहा जागांवर मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. तृणमूल काँग्रेसने क्रिकेटपटू युसूफ पठाणसारख्या राज्याबाहेरील उमेदवारांनादेखील तिकीट दिले आहे.
ममतांनी सॉफ्ट हिंदुत्त्वाचे धोरण घेतले असून, भाजपच्या बाजूने झुकलेला मतदार आपल्याकडे ओढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 

Web Title: Soft Hindutva V/s Hard Hindutva in West Bengal: Whose 'Khela Hobe'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.