ऑनलाईन गेमचं व्यसन! घरातील दागिने चोरताना आईनं पाहिलं; संतापलेल्या मुलानं पुढं जे केलं ते भयंकर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 21:45 IST2025-10-06T21:44:15+5:302025-10-06T21:45:35+5:30
ऑनलाइन गेम खेळण्याच्या सवयीमुळे कर्जात बुडालेल्या गेलेल्या एका तरुणाने घरात चोरी करताना अडथळा आणणाऱ्या आपल्या आईची निर्घृण हत्या केली.

ऑनलाईन गेमचं व्यसन! घरातील दागिने चोरताना आईनं पाहिलं; संतापलेल्या मुलानं पुढं जे केलं ते भयंकर!
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून एक धक्कादायक आणि तितकीच खळबळजनक घटना समोर आली. मोबाइल फोनवर ऑनलाइन गेम खेळण्याच्या सवयीमुळे कर्जाच्या खाईत गेलेल्या एका तरुणाने घरात चोरी करताना अडथळा आणणाऱ्या आपल्या आईची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी घरात दरोडा पडल्याचा बनाव रचला. मात्र, पोलिसांच्या कसून तपासामुळे त्याचे हे क्रूर कृत्य उघडकीस आले. याप्रकरणी आरोपी मुलाला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निखिल यादव उर्फ गोलू याने स्वतःच्या घरी दरोडा पडला आणि दरोडेखोरांनी आईची हत्या केली, तर आपल्याला मारहाण केली, असा बनाव केला. आपल्या घरात दरोडा पडला असून त्यांनी आईची हत्या आणि मलाही मारहाण केली, अशी माहिती गोलूने त्याचे वडील रमेश यादव यांना दिली. रमेश यादव घरी पोहोचले, तेव्हा घरातील सामान विखुरलेले होते आणि पत्नी मृतावस्थेत होती. त्यानंतर रमेश यांनी ताबडतोब पोलिसांना कळवले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला. या तपासणीत स्वत: मुलगा निखिल यानेच आईची हत्या केल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याला फतेहपूर जिल्ह्यातून अटक केली.
निखिलला मोबाईल फोनवर ऑनलाइन गेमिंग आणि जुगाराचे मोठे व्यसन होते, यात त्याला मोठे नुकसान झाले होते, त्यामुळे तो मोठ्या कर्जात बुडाला होता. हे कर्ज फेडण्यासाठी निखिलने घरात चोरी करून सोन्याचे दागिने विकण्याचा कट रचला. जेव्हा निखिल दागिने चोरत असताना त्याची आई रेणू यादव यांनी त्याला पाहिले आणि पकडले, तेव्हा निखिलने तिची हत्या केली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत.