वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 06:11 IST2025-07-28T06:10:36+5:302025-07-28T06:11:28+5:30

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासह अनेक नेत्यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त केला.

rumors of power outage sparks panic stampede at mansa devi temple in haridwar | वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी

वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी

हरिद्वार : उत्तराखंडच्याहरिद्वार येथील मनसा देवी मंदिर क्षेत्रात रविवारी झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला तर २८ जण जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. मंदिरापासून काही अंतरावर पायऱ्यांजवळ वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेने ही दुर्घटना घडली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासह अनेक नेत्यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त केला.

मंदिरापासून १०० फूट खाली पायऱ्यांनजीक वीजप्रवाह उतरल्याची अफवा पसरली. त्यानंतर भयभीत भाविकांनी पळापळ सुरू केल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. पोलिस व बचाव दलाची पथके घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मदत कार्य सुरू झाले. या अभियानादरम्यान ३४ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी तपासून सहा जणांना मृत घोषित केले. या घटनेचे न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हरिद्वारचे अपर जिल्हाधिकारी या चौकशीचे नेतृत्व करतील आणि १५ दिवसांत अहवाल सादर करतील. 

अर्धा तास आधी रस्ता बंद केल्यामुळे अनर्थ टळला

चेंगराचेंगरीच्या अर्धा तास आधी जिन्याचा मार्ग बंद करण्यात आला नसता, तर आणखी मोठी दुर्घटना घडली असती. भाविकांची संख्या वाढल्याने पायऱ्यांवरील मार्ग बंद केला. आत गेलेले काही भाविक अडकले व अफवेने गोंधळ उडवला, असे कोतवालीचे प्रभारी अधिकारी ऋतेश शाह म्हणाले. जिन्याचा मार्ग सर्वांत जुना असून, सुमारे ७०० पायऱ्या चढून ५०० फूट उंचीवर असलेल्या मंदिरापर्यंत पोहोचावे लागते. (वृत्तसंस्था)

 

Web Title: rumors of power outage sparks panic stampede at mansa devi temple in haridwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.