पंतप्रधान मोदींचे भाषणच झाले नाही, काँग्रेसच्या महिला खासदारांचा लोकसभेतील 'त्या' दिवशीचा व्हिडीओ आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 14:59 IST2026-02-10T14:56:43+5:302026-02-10T14:59:56+5:30
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा मुद्दा काढला आणि त्यानंतर लोकसभेत गदारोळ सुरु झाला. त्याचा परिणाम म्हणजे पंतप्रधान मोदींना अभिभाषणावरील उत्तरही देता आले नाही.

पंतप्रधान मोदींचे भाषणच झाले नाही, काँग्रेसच्या महिला खासदारांचा लोकसभेतील 'त्या' दिवशीचा व्हिडीओ आला समोर
४ फेब्रुवारी रोजी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील उत्तर देणार होते. पण, पंतप्रधान मोदी येण्यापूर्वीच सभागृहात झालेल्या गोंधळामुळे पंतप्रधानांचे भाषण होऊ शकले नाही. काँग्रेसचे खासदार अनुसूचित प्रकार करणार असल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळे पंतप्रधानांना न येण्याची विनंती केल्याचे नंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही म्हटलं होतं. ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या या गदारोळाचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. भाजपाच्या नेत्यांकडून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
पंतप्रधानांच्या उत्तराच्या भाषणाशिवाय यावेळी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा प्रस्ताव मंजूर केला गेला. त्याची राजकीय वर्तुळात खूप चर्चा झाली आणि वेगवेगळे अर्थ काढले गेले. ४ फेब्रुवारी लोकसभेत झालेल्या गदारोळाचा आणि काँग्रेसच्या महिला खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आसनाजवळ गेल्यानंतरचा व्हिडीओ शेअर केला गेला आहे.
लोकसभेत त्यादिवशी काय घडले?
जो नवीन व्हिडीओ समोर आला आहे, त्यात काँग्रेसच्या महिला खासदार पंतप्रधान बसतात तिथल्या आसनाजवळ येताना दिसत आहे. महिला खासदार पंतप्रधानांच्या आसनाजवळ आल्यानंतर भाजपाचे खासदार त्यांच्याशी बोलताना दिसत आहे. महिला खासदार मोठ्या संख्येने तिथे आल्यानंतर भाजपाचे खासदार निघून जाताना दिसत आहे.
Congress Party is proud of the most degrading behavior by their MPs !! If we had not stopped all BJP MPs and allowed the Women MPs to confront Cong. MPs, it would have led to very ugly scene.
— Kiren Rijiju (@KirenRijiju) February 10, 2026
We have very high consideration, to protect the dignity & sanctity of the Parliament. https://t.co/tRj5HjLKFHpic.twitter.com/aTmktk4Y7E
तर खूप वाईट दृश्य दिसले असते
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी व्हिडीओ पोस्ट करत म्हटले की, "काँग्रेसला त्यांच्या खासदारांकडून करण्यात आलेल्या वाईट वर्तणुकीचा अभिमान वाटत आहे. आम्ही जर आमच्या खासदारांना थांबवले नसते आणि महिला खासदारांना काँग्रेसच्या खासदारांशी सामना करू दिला असता, तर खूप वाईट दृश्य दिसले असते. पण, आम्ही संसदेचे पवित्रता आणि प्रतिष्ठा यांचा सन्मान ठेवतो."
भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनीही एक पोस्ट करत म्हटले की, "राहुल गांधीजी, तुम्ही कट रचला. महिला खासदार संसदेमध्ये पंतप्रधानांच्या खुर्चीला घेराव कसा घालू शकतात? ही संविधानासोबत छेडछाड नाहीये का? भाजपाच्या खासदारांची मर्यादा आणि शालीनता बघा. अशा परिस्थितीतही त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी स्वतःवरचा ताबा सुटू दिला नाही."
