"कोणताही पंतप्रधान दबावाशिवाय हे करू शकत नाही", राहुल गांधींचा मोदींवर निशाणा, कोणत्या मुद्द्यावर बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 17:16 IST2026-02-11T17:13:24+5:302026-02-11T17:16:40+5:30
लोकसभेमध्ये अर्थसंकल्पावरील चर्चेत तालिका अध्यक्षांनी रोखल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेबाहेर बोलताना काही मुद्दे उपस्थित करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

"कोणताही पंतप्रधान दबावाशिवाय हे करू शकत नाही", राहुल गांधींचा मोदींवर निशाणा, कोणत्या मुद्द्यावर बोलले?
एपस्टीन फाईल्स आणि अदाणी प्रकरणावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सरकारला घेरले. पंतप्रधान मोदींवर दबाव आहे, त्यामुळेच त्यांनी हा करार केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. मी जे बोलतो आहे, ते सत्य असल्याचे पुरावेही देतो, असे मी सभागृहात बोललो", असेही राहुल गांधी यावेळी बोलताना म्हणाले.
लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे भाषण झाले. त्यावेळी त्यांनी अनिल अंबानी, माजी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी आणि गौतम अदाणी यांच्या नावांचा उल्लेख केला. तालिका अध्यक्षांनी त्यांना रोखले आणि हे कामकाजातून वगळले. त्यावरून काँग्रेस खासदार आणि भाजपाच्या मंत्र्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचेही बघायला मिळाले.
'सरकारने १८ महिन्यांपासून उत्तर दिलेले नाही'
लोकसभेतील भाषणानंतर राहुल गांधी यांनी संसदेच्या आवारात माध्यमांशी संवाद साधला. राहुल गांधी म्हणाले, "मी म्हणालो की, खरे असल्याचे मी पुरावे देईन, अमेरिकेच्या न्याय विभागाने एपस्टीन फाईल्स रिलीज केल्या आहेत. त्यात हरदीप सिंग पुरी आणि अनिल अंबानी यांची नावे त्यात आहेत. अदानींचं प्रकरण सुरू आहे, त्यात समन्स आले आहे. केंद्र सरकारने १८ महिन्यांपासून त्याला उत्तर दिलेले नाही."
राहुल गांधी म्हणाले, "पंतप्रधानांवर दबाब आहे"
"पंतप्रधानांवर थेट दबाव आहे. सगळ्यांना हे माहिती आहे. पण, मुख्य बाब ही आहे की, भारताचा कोणताही पंतप्रधान दबावाशिवाय हे करू शकत नाही. जे झाले आहे, जे शेतकऱ्यांसोबत झाले आहे. जे माहिती डेटाबद्दल झाले आहे. संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्राबद्दल झाले आहे. ते कोणताही पंतप्रधान करू शकत नाही", असा आरोप राहुल गांधींनी केला.
"सामान्य परिस्थितीत हे करू शकत नाही. कुणीतरी जर तुमचा गळा दाबलेला असेल. घट्ट पकडून ठेवले आहे आणि दबाव निर्माण केला जात आहे", असे राहुल गांधी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबद्दल बोलताना म्हणाले.
राहुल गांधी आले, प्रल्हाद जोशी-अश्विनी वैष्णव निघून गेले
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणावेळी दोन-तीन वेळा गोंधळ झाला. राहुल गांधींचे भाषण झाल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि अश्विनी वैष्णव हे माध्यमांशी संवाद साधत होते. राहुल गांधींकडून केल्या गेलेल्या आरोपाबद्दल बोलत होते.
आज संसद भवन परिसर में नेता प्रतिपक्ष राहुल गांधी बजट स्पीच के बाद मीडिया से बात करने मीडिया कर्मियों के पास पहुंचे। लेकिन उस वक्त केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव और संसदीय कार्य मंत्री प्रहलाद जोशी पहले से मीडिया से बात कर रहे थे। राहुल गांधी हंसकर दोनों मंत्रियों से कहा कि आइए… pic.twitter.com/i3m0bXlG9R
— Ajay Jha (@Ajay_reporter) February 11, 2026
त्याचवेळी राहुल गांधी तिथे आले. त्यांनी प्रल्हाद जोशी यांचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. चर्चा करूया, असे म्हणाले. पण, जोशी यांनी हात झटकला आणि अश्विनी वैष्णव यांच्यासोबत निघून गेले.
