J&K Blast: जप्त स्फोटकांचे नमुने घेताना पोलीस ठाण्यात भीषण स्फोट, नायब तहसीलदारासह ९ ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 10:08 IST2025-11-16T10:06:10+5:302025-11-16T10:08:24+5:30
Jammu and Kashmir explosion: श्रीनगरच्या नौगाम पोलीस ठाण्यात हरयाणातील फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचे नमुने घेण्याचे काम सुरू असताना त्यांचा स्फोट झाला.

J&K Blast: जप्त स्फोटकांचे नमुने घेताना पोलीस ठाण्यात भीषण स्फोट, नायब तहसीलदारासह ९ ठार
सुरेश एस. डुग्गर
लोकमत न्यूज नेटवर्क
जम्मू : श्रीनगरच्या नौगाम पोलिस ठाण्यात हरयाणातील फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचे नमुने घेण्याचे काम सुरू असताना त्यांचा स्फोट झाल्यामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला. तर, ३२ जण जखमी झाले. श्रीनगरच्या नौगाम पोलिस ठाण्यामध्ये शुक्रवारी रात्री ११ वाजून २० मिनिटांनी झालेल्या या दुर्घटनेतील मृतांमध्ये बहुतांश पोलिस कर्मचारी असून, एक नायब तहसीलदार आणि स्थानिक टेलरचा समावेश आहे. हा दहशतवादी हल्ला नसून अपघाताने स्फोट झाला असल्याचे जम्मू आणि काश्मीरचे पोलिस महासंचालक नलिन प्रभात यांनी शनिवारी सांगितले.
जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हा स्फोट इतका जबरदस्त होता की काही मृतदेहांचे अवयव पोलिस स्टेशनपासून सुमारे १०० ते २०० मीटर दूरपर्यंत उडाले. या परिसरातील घरांतून हे अवयव ताब्यात घेण्यात आले आहेत.
काही जण १०० टक्के जळाल्याने त्यांच्या मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. जखमींना उपचारासाठी श्रीनगरमधील आर्मी ९२ बेस रुग्णालय व अन्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. तर काही जणांवर स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटाच्या ठिकाणी सुरक्षा दलाच्या श्वानपथकाद्वारेदेखील पाहणी करण्यात आली.