मध्य प्रदेशात सापडले १६ व्या शतकातील राम मंदिर, ASIची टीम जतन करणार; पाहा, वैशिष्ट्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 18:01 IST2024-03-04T18:00:54+5:302024-03-04T18:01:44+5:30
Ram Mandir: या मंदिराचे जतन करण्यासह पुनरुज्जीवन करण्याचे पुरातत्व विभागाने ठरवले आहे.

मध्य प्रदेशात सापडले १६ व्या शतकातील राम मंदिर, ASIची टीम जतन करणार; पाहा, वैशिष्ट्य
Ram Mandir: अयोध्येत राम मंदिरात भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर आतापर्यंत लाखो भाविकांनी बालस्वरुप रामललाचे दर्शन घेतले. तसेच सढळहस्ते कोट्यवधींचे दान-देणग्या दिल्या. राम मंदिराच्या त्या भव्य सोहळ्याचा प्रभाव अजूनही अनेकांच्या मनावर असल्याचे सांगितले जाते. यातच मध्य प्रदेशातील बुंदेलखंडमध्ये १६ व्या शतकातील एक प्राचीन राम मंदिर सापडले आहे.
भोपाळ येथील पुरातत्व खात्याच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन सर्व्हेक्षण केले आणि सदर राम मंदिर जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. बुंदेलखंडची भूमी ही प्राचीन वारशांची खाण मानली जाते. आजही या भागांत राजे-सम्राटांच्या काळातील प्राचीन किल्ले, मंदिरे तलाव येथे आहेत. त्यापैकी एक प्राचीन मंदिर दमोहच्या नोहटा उप-तहसीलच्या बनवर गावापासून सुमारे ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुआर गावात आहे. हे मंदिर १६-१७ व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे हे राम मंदिर आहे, जे जीर्ण अवस्थेत आहे.
भोपाळहून मुआर येथे पोहोचलेल्या पुरातत्व अधिकारी रमेश यादव यांच्या पथकाने राम मंदिराची पाहणी केली असता त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. मुआरमध्ये १६-१७ व्या शतकातील एक प्राचीन राम मंदिर आहे, जे देखभालीअभावी आज जीर्ण अवस्थेत आहे. त्याचे जतन करण्याबरोबरच भविष्यात आपण त्याचे पुनरुज्जीवनही करू. तसेच येथे आणखी एक प्राचीन ठिकाण आहे, ज्याला १०-११ व्या शतकात मदह (तलाव) असे म्हणतात. तेथेच एका प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. येथे १० व्या ते ११ व्या शतकातील प्राचीन मूर्ती आहेत.
या गावाचा इतिहास पाहिला तर हे तेच ठिकाण आहे, जिथे पूर्वी ७ ते ८ मंदिरांचा समूह आढळला होता. हे ठिकाण सध्या नैसर्गिक आपत्तींमुळे पूर्णपणे विखुरलेले आहे.