कमी मतदानाने राजकीय पक्ष चिंतेत; तीन राज्ये वगळता अन्यत्र ४-६% घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 06:17 AM2024-04-21T06:17:34+5:302024-04-21T06:55:30+5:30

निवडणूक आयोगाकडून अद्याप मतदानाची अंतिम आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ९१ जागांवर सुमारे ६९.५८% मतदान झाले होते.

Loksabha Election 2024 - Low turnout worries political parties; 4-6% decline elsewhere except three states | कमी मतदानाने राजकीय पक्ष चिंतेत; तीन राज्ये वगळता अन्यत्र ४-६% घसरण

कमी मतदानाने राजकीय पक्ष चिंतेत; तीन राज्ये वगळता अन्यत्र ४-६% घसरण

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात २१ राज्यांमध्ये १०२ जागांसाठी जवळपास ६४ टक्के मतदान झाले आहे. तीन राज्ये वगळता १८ राज्यांत मतदानात ४ ते ६ टक्के घसरण झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. गतवळेच्या तुलनेत यंदा पहिल्याच टप्प्यात कमी मतदान झाल्यामुळे राजकीय पक्ष  आणि सर्वेक्षण करणाऱ्या संस्था गोंधळात सापडल्या आहेत. तथापि, सत्ताधारी भाजपला त्याबाबत अवाजवी काळजी वाटत नसल्याचे दिसते. 

निवडणूक आयोगाकडून अद्याप मतदानाची अंतिम आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ९१ जागांवर सुमारे ६९.५८% मतदान झाले होते. यावेळी मात्र छत्तीसगड (१ जागा), मेघालय (२) आणि त्रिपुरा (१) वगळता इतर सर्व राज्यांमध्ये २०१९ निवडणुकीच्या तुलनेत कमी मतदान झाल्याचे दिसते.  २०१९ मधील ३३२ जागांच्या तुलनेत पंतप्रधानांनी एनडीएसाठी ४००हून अधिक जागांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानंतर भाजपने प्रचाराची जोरदार मोहीम सुरू केली आहे. पंतप्रधानांच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींपर्यंत भाजपचे कार्यकर्ते पोहोचत आहेत, तरीही बहुतांश जागेवर मतदान कमीच राहिले. 

राजकीय पक्षांचा सावध पवित्रा 
कमी मतदानामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही आपल्या पक्षाला मोठा विजय मिळेल, असा दावा करणे टाळत आहेत. पक्षांच्या वॉर-रूम टीम कमी मतदानामागील कारणांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहेत. २०१९च्या तुलनेत राजस्थानमधील काही जागांवर दहा टक्के कमी मतदान झाल्यामुळे सर्वात जास्त गोंधळ उडाला. राजस्थानात १२ जागांवर झालेली घसरण ५ टक्के आहे. तसेच, बिहार (४ जागा), उत्तर प्रदेश (८) आणि उत्तराखंडमधील (५ जागा) मतदान ४ ते ६ टक्के कमी आहे.

तापमान वाढ कारण?
कमी मतदानाचे आणखी एक कारण म्हणजे वाढलेले तापमान. २०१९ मध्ये उष्णतेची लाट नव्हती. यंदा तापमान वाढीचा फटका मतदानावर झाल्याचे म्हटले जाते. कमी मतदान झाले असले तरी यावेळी मतदार गप्प असल्याने कोणालाही खात्री देता येत नाही, असे मत विश्लेषकांनी मांडले.   

पहिल्या टप्प्यातील मतदान, अंतिम आकडा आज येणार

लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी झालेल्या मतदानाचा आकडा ६५.५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, पहिल्या टप्प्यात अधिक प्रमाणात मतदान झाले आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या ९१ जागांसाठी ६९.४३ टक्के मतदान झाले होते. यंदा पहिल्या टप्प्यात नेमके किती मतदान झाले याचा अंतिम आकडा निवडणूक आयोगाकडून रविवारी जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Loksabha Election 2024 - Low turnout worries political parties; 4-6% decline elsewhere except three states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.