नेहरू-इंदिरांच्या काळात 12 लाखांच्या कमाईवर 10 लाख कर लागायचा; PM मोदींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 15:30 IST2025-02-02T15:29:21+5:302025-02-02T15:30:09+5:30

'भाजप सरकारच्या काळात 12 लाख रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही.'

During Nehru-Indira's era, income of Rs 12 lakhs would have been taxed at Rs 10 lakh; PM Modi's criticism | नेहरू-इंदिरांच्या काळात 12 लाखांच्या कमाईवर 10 लाख कर लागायचा; PM मोदींचे टीकास्त्र

नेहरू-इंदिरांच्या काळात 12 लाखांच्या कमाईवर 10 लाख कर लागायचा; PM मोदींचे टीकास्त्र

PM Narendra Modi on Budget : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी(2 फेब्रुवारी) दिल्लीतील आरके पुरम येथे जाहीर सभेला संबोधित करताना मागील काँग्रेस सरकारांवर निशाणा साधला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल बोलताना, पंतप्रधानांनी कर सवलतीचा उल्लेख केला. ते म्हणाले, 'तुम्ही नेहरुजींच्या काळात 12 लाख रुपये कमावले असते, तर तुमच्या पगाराच्या एक चतुर्थांश रक्कम सरकारने परत घेतली असती.'

यावेळी बोलताना पीएम मोदी म्हणतात, 'आज जर पंडीत नेहरुंचा काळ असता, तर 12 लाख रुपयांवर एक चतुर्थांश कर भरावा लागला असता. इंदिरा गांधींचा काळ असता तर 12 लाख रुपयांपैकी 10 लाख रुपये करात गेले असते. 10-12 वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात 12 लाख रुपयांवर 2 लाख 60 हजार रुपये कर भरावा लागायचा. पण, भाजप सरकारच्या काळात 12 लाख रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही.'

'12 ते 24 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर प्रतिवर्षी 1 लाख 10 हजार रुपयांची अतिरिक्त बचत होईल. आजचा भारत भाजपसोबत आहे. या अर्थसंकल्पात गरिबांसाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. हा अर्थसंकल्प गरिबांसाठी आहे. मध्यमवर्गीयांसाठी हा सर्वात अनुकूल अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे भारतातील प्रत्येक कुटुंब आनंदी आहे. 12 लाखांच्या उत्पन्नावर शून्य करामुळे मध्यमवर्गीय लोकांचे हजारो रुपयांची बचत होणार आहे. हा अर्थसंकल्प मध्यमवर्गीयांचा खिसा भरणारा अर्थसंकल्प आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आयकरात एवढा मोठा सवलत देण्यात आली आहे,' असा दावाही पीएम मोदींनी यावेळी केला.

'आप'ने दिल्लीची 11 वर्षे उद्ध्वस्त केली
यावेळी पीएम मोदींनी दिल्लीतील आप सरकारवरही निशाणा साधला. 'वसंत पंचमीपासून हवामान बदलण्यास सुरुवात होते. दिल्लीत 5 फेब्रुवारीला विकासाचा नवा झरा वाहणार अन् दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होणार. यावेळी संपूर्ण दिल्ली भाजपसोबत आहे. आपने दिल्लीची 11 वर्षे उध्वस्त केली. मला तुमची सेवा करण्याची संधी द्या. तुमच्या प्रत्येक समस्या सोडवण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.'

'दिल्लीत मतदानापूर्वीच झाडूच्या काढ्या बाहेर पडत आहेत. आपचे नेते पक्षावर आरोप करत राजीनामे देत आहेत. यावरुनच आम आदमी पक्षावर जनता नाराज असल्याचे सिद्ध होते. दिल्लीतील जनतेच्या रोषाला आप एवढी घाबरली आहे की, दर तासाला खोट्या घोषणा करत आहे. पण आपचा मुखवटा आता गळून पडला आहे. यंदा दिल्लीत भाजपाचे सरकार स्थापन होणार आहे,' असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

Web Title: During Nehru-Indira's era, income of Rs 12 lakhs would have been taxed at Rs 10 lakh; PM Modi's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.