इस्लामनगरचं झालं जगदीशपूर, पेढे वाटून जल्लोष; रक्तरंजीत होता इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 20:58 IST2023-02-03T20:57:41+5:302023-02-03T20:58:22+5:30
सन १७१५ मध्ये दोस्त मोहम्मद खान याने जगदीशपूर येथे आक्रमण केले.

इस्लामनगरचं झालं जगदीशपूर, पेढे वाटून जल्लोष; रक्तरंजीत होता इतिहास
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून १४ किमी अंतरावर असलेल्या एका सुंदर गावाचं पुन्हा एकदा नामकरण झालं आहे. १७ व्या शतकात या गावातील बनविण्यात आलेल्या किल्ल्यास पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. कालपर्यंत या वास्तूचं नाव इस्लाम नगर होतं, ते आता पुन्हा एकदा जुन्याच नावाने म्हणजे जगदीशपूर नावाने ओळखले जाणार आहे. केंद्र सरकारने या गावाचे नामांतर जगदीशपूर करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानंतर, राज्य सरकारनेही बुधवारी नोटीफिकेशन जारी करुन या गावाचे नाव जगदीशपूर असं केलं आहे.
इस्लामनगर गावाचे नाव जगदीशपूर झाल्यानंतर तेथील स्थानिकांनी फटाके वाजवून अन् मिठाई वाटून जल्लोष साजरा केला. त्यावेळी, ढोल-ताशा वाजवूनही आनंद व्यक्त करण्यात आला. अंगावर काटा आणणारा हा इतिहास आहे, ज्यावेळी जगदीशपूरचे नाव इस्लामनगर करण्यात आले होते. औरंगजेबच्या सैन्याचे पळपूटे सैनिक मित्र मोहम्मद खान याने ३०८ वर्षांपूर्वी या गावाचे नाव इस्लामनगर ठेवले होते. गेल्या ३० वर्षांपासून या गावाचे नाव जगदीशपूर करण्याची फाईल सरकार दफ्तरी पडून होती.
सन १७१५ मध्ये दोस्त मोहम्मद खान याने जगदीशपूर येथे आक्रमण केले. पण, त्यांला यश मिळाले नाही. राजपूतांवर आक्रमण केल्यानंतरही अपयश आल्यामुळे मोहम्मद खानने आपल्या स्वभावनुसार मैत्रीचा हात पुढे केला. त्याने देवरा चौहान या राजाला बेस नदीकिनारी जेवणाचे आमंत्रण दिले. देवरा चौहानसह सर्वच राजपूत रात्रीचं स्नेहभोजन करत होते, त्याचवेळी तंबूची रस्सी कापण्यात आली. या सर्व राजपूतांना तलवारीने सपासप वार करुन ठार करण्यात आले. या सर्वांच्या रक्ताचा पाट शेजारील नदीत वाहिल्यांनंतर नदीचं पाणीही लाल झालं होतं, असा इतिहास सांगतो. त्यानंतर, मोहम्मद खानने जगदीशपूरवर कब्जा केला आणि याचं नाव बदलून इस्लामनगर केलं होतं.