४५ वर्षांनी झाले हिडकल जलाशयातील विठ्ठलाचे दर्शन, पर्यटकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 02:05 PM2023-07-07T14:05:48+5:302023-07-07T14:06:16+5:30

विठ्ठल मंदिराच्या काळ्या दगडांच्या भव्य दर्शनीय भागाचे बांधकाम १२ व्या आणि १३ व्या शतकातील प्रख्यात वैशिष्ट्यपूर्ण अशा हेमाडपंती आहे.

After 45 years the darshan of Vitthala in Hidkal Reservoir, crowds of tourists | ४५ वर्षांनी झाले हिडकल जलाशयातील विठ्ठलाचे दर्शन, पर्यटकांची गर्दी

४५ वर्षांनी झाले हिडकल जलाशयातील विठ्ठलाचे दर्शन, पर्यटकांची गर्दी

googlenewsNext

बेळगाव : यंदा मान्सून अतिशय लांबणीवर पडला असून, बेळगावला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांनीही तळ गाठायला सुरुवात केली आहे. जुलै महिना उजाडला तरी अद्याप पावसाने हजेरी लावली नाही. जोरदार पावसाकडे आशेने डोळे लावून बसलेल्या प्रत्येकाकडून पावसाची प्रतीक्षा करण्यात येत आहे. मात्र, जून महिन्यात केवळ पावसाचा शिडकावाच नागरिकांना अनुभवता आला आहे.

सध्या मान्सून लांबणीवर पडल्यामुळे हिडकल जलाशयातील पाणीसाठादेखील कमी झाला असून, जलाशयाचे पात्र कोरडे पडू लागले आहे. या जलाशयाच्या आत असणारे श्री विठ्ठल मंदिर पुन्हा वर आले आहे. हिडकल जलाशयातील पाणी साठ्याने तळ गाठण्यास सुरुवात केल्यामुळे वर्षभर पाण्यात बुडालेले भव्य असे विठ्ठल मंदिर पाण्याबाहेर आले आहे. त्यामुळे गावकरी आणि पर्यटकांना मंदिरात जाऊन देवदर्शन घेण्याची संधी प्राप्त झाली आहे.

हिडकल जलाशयाचे बांधकाम १९७७ मध्ये जेव्हा पूर्ण झाले, तेव्हा त्याच्या पाण्याने हिडकल आणि हुन्नूर ही दोन गावे पाण्याखाली गेली. येथील श्री विठ्ठल मंदिरदेखील तब्बल ४५ वर्षे पाण्याखाली बुडालेले होते. विठ्ठल मंदिराच्या काळ्या दगडांच्या भव्य दर्शनीय भागाचे बांधकाम १२ व्या आणि १३ व्या शतकातील प्रख्यात वैशिष्ट्यपूर्ण अशा हेमाडपंती आहे.

पाण्यात बुडवून राहिल्यामुळे कालांतराने मंदिराच्या बाह्य भिंतींचे नुकसान झाले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात जलाशयाचे पाणी कमी झाले की या मंदिराचे दर्शन घडत असते. मात्र, यंदा मान्सूनच्या पावसाने दीर्घकाळ दडी मारल्यामुळे श्री विठ्ठल मंदिर पूर्णपणे पाण्याबाहेर येऊन भक्तमंडळी आणि पर्यटकांना थेट मंदिरात जाऊन देवदर्शन घेण्याची संधी प्राप्त झाली आहे.

४०-४५ वर्षांनंतर मंदिरातील विठ्ठलाचे दर्शन घेऊन वृद्धाश्रमाच्या आजी-आजोबांनी समाधान व्यक्त केले. यंदाच्या लांबलेल्या मान्सूनमुळे सर्वत्र पाणी टंचाईचे सावट पसरले आहे. यावेळी माजी महापौर विजय मोरे, वसंत बालिगा, विनायक जैनोजी, लक्ष्मण चौगुले, विनायक पाटील, शॅरेल मोरे, मारिया मोरे, विजया पाटील आदींनी दर्शन घेतले.

Web Title: After 45 years the darshan of Vitthala in Hidkal Reservoir, crowds of tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.