Nashik Municipal Election 2026 : वारसा, वर्चस्व, नाराजीची अटीतटीची लढाई; आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 16:00 IST2026-01-12T15:59:20+5:302026-01-12T16:00:57+5:30
Nashik Municipal Election 2026 : महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ यंदा केवळ आकड्यांची लढाई न राहता राजकीय प्रतिष्ठेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

Nashik Municipal Election 2026 : वारसा, वर्चस्व, नाराजीची अटीतटीची लढाई; आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला
जहीर शेख
नाशिक - महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ यंदा केवळ आकड्यांची लढाई न राहता राजकीय प्रतिष्ठेचा केंद्रबिंदू ठरला आहे. माजी आमदार वसंत गिते यांचे चिरंजीव प्रथमेश गिते पुन्हा रिंगणात उतरल्याने या प्रभागाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. पक्षफुटी, बदललेली समीकरणे आणि पॅनलच्या राजकारणामुळे येथे प्रत्येक मत मोलाचे ठरणार आहे.
या प्रभागातील 'अ' गटात थेट सामना रंगणार आहे. उद्धवसेनेचे माजी उपमहापौर प्रथमेश गिते आणि भाजपचे मिलिंद भालेराव यांच्यातील लढत म्हणजे वारसा विरुद्ध संघटना अशीच पाहिली जात आहे. गिते यांना वडिलांचा राजकीय वारसा असला तरी नाशिक मध्य च्या आमदार यांच्या दृष्टीने देक्यांनी फरांदे यांच्या दृष्टीने ही निवडणूक रंगणार आहे.
'ब' गटात मात्र तिरंगी लढतीमुळे चित्र अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. राष्ट्रवादीचे (अजित पवार) राहत काझी, भाजपच्या माजी नगरसेविका अर्चना थोरात आणि उद्धवसेनेच्या सीमा पवार यांच्यातील सामना मतविभाजनाच्या शक्यतेमुळे नक्की फायदा कोणाला हे दिसणार आहे. 'क' गटात जुने प्रतिस्पर्धी पुन्हा आमनेसामने आले आहेत. भाजपचे माजी नगरसेवक सचिन मराठे आणि उद्धवसेनेचे गुलजार कोकणी यांच्यातील लढत ही कामगिरीच्या हिशोबावर लढली जात आहे. काठेगल्लीपासून मुंबई नाक्यापर्यंत पसरलेल्या या प्रभागात नागरी समस्या अजूनही कायम आहेत. घरकुल, पाणीपुरवठा, खराब रस्ते आणि ड्रेनेजच्या प्रश्नांमुळे मतदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे यंदा केवळ पक्षाच्या नावावर नव्हे, तर प्रत्यक्ष काम करणाऱ्या उमेदवारांनाच मत देण्याची भूमिका अनेक मतदार घेत असल्याचे दिसते. या निवडणुकीत एकगठ्ठा मतदान झाले, तर संपूर्ण गणित बदलू शकते.
पॅनलच्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न सुरू असले तरी स्थानिक पातळीवरील असंतोष कोणाच्या अडचणीत वाढ करतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. २०१७ मध्ये भाजपने येथे वर्चस्व राखले होते, मात्र आजची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. फुटलेले पक्ष, नव्या आघाड्या आणि बदललेली निष्ठा यामुळे तोच इतिहास पुन्हा घडेल, याची खात्री देता येत नाही. एकूणच प्रभाग क्रमांक १५ मध्ये यंदा वारसा, पक्षनिष्ठा आणि मतदारांची नाराजी यांचा कस लागणार आहे.
या आहेत समस्या
नागजी चौकात असलेले अतिक्रमण
वडाळारोड वाहतूक कोंडी
काटेगल्ली चौफुली अरुंद रस्ते
परिसरातील खराब रस्ते
पखालरोड पाण्याची टाकी बांधून पडून
भाभानगर महिला रुग्णालयाचे काम संथगतीने