आम आदमी पार्टीत अंतर्गत संघर्ष उफाळला, घिया यांच्या हकालपट्टीवरून दोन गट आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:02 IST2026-01-06T16:02:41+5:302026-01-06T16:02:51+5:30
Nashik Municipal Election 2026 : आम आदमी पार्टीत (आप) अंतर्गत वाद चिघळल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

आम आदमी पार्टीत अंतर्गत संघर्ष उफाळला, घिया यांच्या हकालपट्टीवरून दोन गट आमने-सामने
नाशिक : आम आदमी पार्टीत (आप) अंतर्गत वाद चिघळल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. कोणताही अधिकार नसताना पक्षाचे 'ए' आणि 'बी' फॉर्म वाटप केल्याचा आरोप करत शहराध्यक्ष अमोल लांडगे यांनी स्वप्नील घिया यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे पत्र काढले होते. मात्र, या निर्णयाला पक्षाच्या कार्याध्यक्ष योगेश कापसे यांनी स्पष्टपणे आव्हान दिले असून ही हकालपट्टी बेकायदेशीर असल्याचे पत्र काढत जाहीर केले आहे.या परस्परविरोधी पत्रांमुळे आम आदमी पार्टीतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आली आहे.
दोन दिवसांपूर्वी अमोल लांडगे यांनी काढलेल्या पत्रात घिया यांनी पक्षाची परवानगी नसताना 'आप'चे अधिकृत 'ए' आणि 'बी' फॉर्म वाटप केल्याचा आरोप केला होता. तसेच फेसबुकवर त्यासंबंधी पोस्ट करून पक्षाची प्रतिमा मलिन केल्याचा आणि माध्यमांमध्ये अधिकार नसताना मनमानी माहिती दिल्याचा ठपकाही ठेवत घिया यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे लांडगेयांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, सोमवारी (दि. ५) 'आप'चे कार्याध्यक्ष योगेश कापसे यांनी स्वतंत्र पत्रक काढत शहराध्यक्ष लांडगे यांच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
कापसे यांनी स्पष्ट केले की, नाशिक महापालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया राबविण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून महापालिका निवडणूक प्रचार समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे सचिव म्हणून स्वप्नील घिया यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली असून, उमेदवारांना 'ए' आणि 'बी' फॉर्म देण्याचा अधिकार त्यांच्याकडेच आहे.
कापसे यांनी पुढे सांगितले की, प्रत्येक उमेदवाराची सखोल छाननी केल्यानंतरच समितीच्या वतीने 'ए' आणि 'बी' फॉर्म देण्यात आले आहेत. त्यामुळे घिया यांच्यावरील सर्व आरोप निराधार व खोटे असून, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ते आपल्या पदावर कायम राहणार आहेत. या परस्परविरोधी पत्रांमुळे आम आदमी पार्टीतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले असून, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील नेतृत्व आणि अधिकार रचनेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.