मनपा निवडणुकीत शिंदेसेनेचा स्ट्राइक रेट सर्वाधिक राहणार- खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 12:44 IST2026-01-08T12:42:10+5:302026-01-08T12:44:18+5:30
उमेदवारांच्या प्रचारासाठी रोड शो; काळारामाचे घेतले दर्शन

मनपा निवडणुकीत शिंदेसेनेचा स्ट्राइक रेट सर्वाधिक राहणार- खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
नाशिक/नाशिकरोड : जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांमध्ये शिंदेसेनेचा स्ट्राईक रेट चांगला राहिला असून पाच नगरपरिषदांवर आमचेच नगराध्यक्ष विराजमान झाले आहेत. हीच परंपरा कायम ठेवत नाशिक महापालिकेतही शिंदेसेनेनाच महापौर बसेल, असा विश्वास शिंदेसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. बुधवारी (दि. ७) श्रीकांत शिंदे नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी शिंदेसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. प्रचाराच्या शुभारंभापूर्वी त्यांनी काळाराम मंदिरात आरती करून दर्शन घेतले.
नाशिक महापालिकेतील शिंदेसेनेची ताकद अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, मागील निवडणुकीत शिवसेनेचे ३५ नगरसेवक निवडून आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात राज्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली असून नाशिकला सर्वाधिक निधी मिळाला आहे, असे सांगत त्यांनी मंत्री दादा भुसे आणि आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून शहरासाठी भरीव निधी आणण्यात आल्याचे नमूद केले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मोठ्या विकासकामांना गती मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपकडून युती चुकीची
भाजपने अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि अकोटमध्ये एमआयएमसोबत युती करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असून, याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीच उत्तर द्यावे, अशी स्पष्ट आणि थेट टीका शिंदे यांनी केली. शिंदे यांचा प्रभाग २० मधील जय भवानी रोड श्री तुळजाभवानी मंदिरापासून मंदिराप प्रभागात रोडशो आयोजित करण्यात आला होता.
अडीच वर्षात सर्वाधिक योजना राबविल्या
१. आगरटाकळी प्रभाग १६ मध्ये आयोजित सभेत खासदार शिंदे यांनी बहुसंख्येने उपस्थित असलेल्या महिलांना तुम्ही सर्व एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहीण व माझ्या आत्या असून मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात सर्वाधिक जास्त योजना या राबविल्या. माझे वडील एकनाथ शिंदे हे शेतकऱ्याचा मुलगा व रिक्षा चालक असल्याने त्यांना तुमचे दुःख, अडचणी माहित आहे. ते नगरविकास खात्याचे मंत्री असून प्रभागात विकास कामासाठी मोठा निधी दिला जाईल.
२. लाडक्या बहिणी सोबत, लाडका भाऊ, बेरोजगार, शेतकरी अशा विविध योजना राबवून शासन आपल्या दारी ही योजना शिंदे यांनी अंमलात आणली. त्यामुळे शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार, रिपाइं युतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन खासदार शिंदे यांनी केले. यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सह संपर्कप्रमुख राजू लवटे, अनिल ढिकले आदी उपस्थित होते.