सत्तास्नानासाठी घोषणांचा अमृत वर्षाव; फडणवीस म्हणतात, नाशिकसाठी एक लाख कोटींची औद्योगिक गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 15:31 IST2026-01-12T15:29:52+5:302026-01-12T15:31:37+5:30
सिंहस्थासाठी ३० हजार कोटींची कामे

सत्तास्नानासाठी घोषणांचा अमृत वर्षाव; फडणवीस म्हणतात, नाशिकसाठी एक लाख कोटींची औद्योगिक गुंतवणूक
नाशिक हे केवळ शहर नसून, सांस्कृतिक राजधानी आहे आणि ते बदलण्याची ताकद भाजपकडे आहे, आगामी काळात नाशिकला लॉजिस्टिकआणि टेक्नॉलॉजी हब बनविण्यासाठी भाजपची वाटचाल सुरू असून, त्यासाठी औद्योगिक गुंतवणुकीसह विविध विकासकामांसाठी सुमारे एक लाख तीस हजार कोटींच्या कामांचा लेखाजोखा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. आतापर्यंत आलेल्या तसेच येऊ घातलेल्या औद्योगिक प्रकल्पांमार्फत १ लाख कोटींची गुंतवणूक नाशिकमध्ये होत असल्याचा दावा करताना ३० हजार कोटींच्या सिंहस्थकामांचा अमृत वर्षावच जणू त्यांनी आपल्या भाषणाद्वारे नाशिककरांवर केला.
नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. ११) गोदाकाठच्या गौरी पटांगणात झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, आ. देवयानी फरांदे, आ. राहुल ढिकले, आ. सीमा हिरे, माजी आ. बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष सुनील केदार, सरचिटणीस सुनील देसाई यांसह मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काही नेते नाशिकमध्ये येऊन रामाचे स्मरणही करत नाहीत, जो रामाचा नाही तो कामाचा नाही, असे सांगत माझे नाशिकशी नाते कालही होते, आजही आहे आणि उद्याही राहील, असे ते म्हणाले. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी निवडणूक आल्यावरच त्यांना नाशिक आठवत असल्याने ते निवडणूक पर्यटक असल्याचे वक्तव्य केले. कुंभ हा केवळ उत्सव नसून, आपल्या संस्कृतीचे दर्शन आहे. लोकांनी टीका केली, तरी कुंभ बंद पडणार नाही. अकबराने कुंभ सुरू केला, असे काही डाव्या चळवळीतले लोक बोलतात. याबाबत त्यांचा अभ्यास कमी असून, अकबराच्या कित्येक पिढ्यांच्या आधी कुंभाचे स्नान सुरू होते आणि ते कोणीही बंद करू शकणार नाही असेही फडणवीस म्हणाले.
कितीही प्रयत्न करा, कुंभमेळा यशस्वी करूच!
कुंभमेळ्यासाठी आलेले देशभरातील साधू त्यांचे पारंपरिक ठिकाण असलेले तपोवनात नाही तर कुठे राहणार? मात्र, काही डाव्या विचारांचे लोक यात नाहक वातावरण तापवू लागले, अशी टीका कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी केली. दहा वर्षांत आलेली झाडे काढून दुसरीकडे लावणार होतो. मात्र, या कामात अडथळे निर्माण केले जात आहेत. सात ते आठ झाडे लावण्यात आली आहेत. ठाकरे बंधू मला लाकूड तोड म्हणाले, पण यांनी कितीही अडथळे आणले तरी कुंभमेळा यशस्वी करूच. ३० हजार कोटींची कामे शहरात होत असल्याचा दावा महाजन यांनी केला.
विकासाच्या आड येणाऱ्यांचा बंदोबस्त करा
श्रीरामाच्या विचारावर चालणारा आमचा पक्ष आहे. कुंभमेळ्यावरून राजकारण करणाऱ्यांचा बंदोबस्त करा, असे मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. नाशिकमध्येच शूर्पणखेचे नाक कापले गेले होते, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे. म्हणूनच म्हणते की, विकासाच्या आड येणाऱ्या विरोधकांचा कायमचा बंदोबस्त करायचा आहे. त्यासाठी प्रथम मनपा निवडणूक यशस्वी करायची असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांचे अॅडव्हान्टेज नाशिक
पायाभूत सुविधा
- द्वारका सर्कलला ४०० कोटींचा अंडरपास.
- ६० हून अधिक रस्त्यांचे व्हाइट टॉपिंग.
- गंगापूर धरणातून नवीन पाइपलाइनद्वारे पिण्याचे पाणी.
- ४७ टाक्यांच्या माध्यमातून प्रेशराइज्ड पाणीपुरवठा योजना.
- कायदा सुव्यवस्थेसाठी २ हजार सीसीटीव्ही.
नाशिक थेट कनेक्ट
- विमानतळाची क्षमता ४ पटीने वाढवणार
- ४ राष्ट्रीय ४ राज्यस्तरीय मार्ग समृद्धीला जोडले जाणार.
- नाशिक-पुणे महामार्ग सहा पदरी होणार.
- भिवंडी येथून एक वेगळा रस्ता करून दोन तासांत मुंबईत पोहोचता येणार.
वृक्षतोडीचा निर्णय न्यायालयाच्या निकालावर
साधुग्राम प्रकल्पावर झालेल्या वादावर मुख्यमंत्र्यांनी जुने ठराव, गुगल मॅप आणि न्यायालयीन निर्णयांचा संदर्भ देत मनसे आणि उद्धवसेनेवर टीका केली. भाजपने महत्वाकांक्षी पद्धतीने वृक्षारोपण केले असून, साधुग्रामप्रश्नी न्यायालयाचा निकाल आम्हाला मान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
५७ + ५० हजार कोटींची औद्योगिक गुंतवणूक
नाशिकमध्ये ५७ हजार कोटींची गुंतवणूक आधीच आली आहे. त्यात जिंदाल, रिलायन्स, महिंद्रा, एचएएल, क्रॉम्प्टन यांसारख्या उद्योगांसह एअरफोर्स प्रकल्पासाठीही नाशिक सुचवण्यात आले आहे. पुढील काळात ५० हजार कोटींची गुंतवणूक पाइपलाइनमध्ये असल्याची माहिती त्यांनी दिली.
३० हजार कोटींची कामे
मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये तब्बल ३० हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू असल्याची माहिती दिली. १० हजार कोटींचा रिंगरोड, चार राष्ट्रीय व चार राज्य महामार्गाची जोडणी, समृद्धी महामार्गाशी थेट कनेक्टिव्हिटी यामुळे नाशिक पर्यटन आणि गुंतवणुकीचे केंद्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गोदावरी स्वच्छतेसाठी अडीच हजार कोटी
गोदावरी स्वच्छतेसाठी पहिल्या टप्प्यात १ हजार कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात दीड हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. एसटीपी प्रकल्पांच्या कार्यक्षमतेनुसारच पैसे दिले जातील. 'गोदावरीचे पाणी अंघोळीसाठी आणि पिण्यासाठी योग्य करू', असे आश्वासन त्यांनी दिले.