नाशिकमध्ये आमदार पुत्रांचा पत्ता कट; भरलेले अर्ज घेणार मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 10:25 IST2025-12-30T10:23:26+5:302025-12-30T10:25:26+5:30
आमदार फरांदे यांचे पुत्र अजिंक्य यांनी प्रभाग क्रमांक ७ मधून ओबीसी गटातून अर्ज दाखल केला होता, तर आमदार हिरे यांच्या कन्या रश्मी यांनी सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८ मधून ओबीसी महिला याच प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता. या दोघांनीसुद्धा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून तयारी करून जनसंपर्क वाढवला होता.

नाशिकमध्ये आमदार पुत्रांचा पत्ता कट; भरलेले अर्ज घेणार मागे
नाशिक : भाजपच्या प्रदेश नेत्यांनी कोणत्याही आमदारांच्या मुला-मुलींना उमेदवारी दिली जाणार नाही, असे जाहीर केले असून, तसे फोनही पक्षाच्या नेत्यांना आल्याने आमदार देवयानी फरांदे यांचा मुलगा अंजिक्य आणि आमदार सीमा हिरे यांची कन्या रश्मी हिरे-बेंडाळे यांची उमेदवारी अडचणीत आली आहे. हे दोघेही माघार घेतील, असे दोन्ही आमदारद्वयींनी सांगितले. आमदार फरांदे यांचे पुत्र अजिंक्य यांनी प्रभाग क्रमांक ७ मधून ओबीसी गटातून अर्ज दाखल केला होता, तर आमदार हिरे यांच्या कन्या रश्मी यांनी सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८ मधून ओबीसी महिला याच प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता. या दोघांनीसुद्धा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून तयारी करून जनसंपर्क वाढवला होता.
इच्छुकांचे बीपी-शुगर आऊट ऑफ कंट्रोल!
अकोला : महायुती आणि मविआत अद्यापही जागा वाटपाचा तिढा कायम आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ व अगदी मध्यरात्रीपर्यंत बैठकांचे सत्र सुरू असून, घोषणा होत नसल्याने इच्छुक उमेदवारांच्या जिवाची घालमेल सुरू आहे. या राजकीय अनिश्चिततेचा थेट परिणाम आता उमेदवारांच्या आरोग्यावर दिसू लागला असून, अनेक ‘भावी नगरसेवकांचे’ बीपी आणि शुगर वाढल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. ‘नाव येणार की कट होणार?’ या चिंतेने वाढलेल्या तणावात अनेक इच्छुकांना डोकेदुखीचा होतो आहे. परिणामी शहरातील फॅमिली डॉक्टरांकडे इच्छुक धाव घेत आहेत.
लातूर आखाड्यात इच्छुकांची धाकधूक
लातूरमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस उजाडला तरी अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने अधिकृत उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. ना ‘महायुती’ चे जागावाटप ठरले आहे, ना ‘महाविकास आघाडी’ मध्ये एकमत झाले आहे. त्यामुळे लातूरच्या राजकीय वर्तुळात सध्या केवळ ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका पाहायला मिळत आहे. भाजप प्रणित महायुती आणि काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचा घोळ अद्याप मिटलेला नाही. भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार ) यांच्यात जागांच्या संख्येवरून ठोस निर्णय होऊ शकलेला नाही.