Municipal Election: भाजपाची मतदानाआधी मोठी कारवाई! माजी महापौरांसह ५४ जणांची पक्षातून हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 13:58 IST2026-01-13T13:57:07+5:302026-01-13T13:58:38+5:30
Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये भाजपाने कारवाईचा बडगा उगारत पक्षातून ५४ जणांना हाकलले. पक्षातून बडतर्फ करण्यात आलेल्यांमध्ये माजी महापौरांचाही समावेश आहे.

Municipal Election: भाजपाची मतदानाआधी मोठी कारवाई! माजी महापौरांसह ५४ जणांची पक्षातून हकालपट्टी
Nashik Municipal Elections 2026 BJP: महापालिकांच्या मतदानाची वेळ काही तासांवर आलेली असताना भाजपाने नाशिकमध्ये मोठी कारवाई केली. भाजपाने केलेल्या कारवाईने शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली. भाजपाने माजी महापौरांसह तब्बल ५४ पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरीची भूमिका घेतलेल्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये भाजपाने अनेक आयात केलेल्यांना उमेदवारी दिल्याने मोठी नाराजी उमटली होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही नाशिकमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. पक्षाकडून डावलण्यात आल्याने अनेक स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आणि निवडणुकीच्या रिंगणात उडी मारली.
२० उमेदवारांसह ५४ जणांची हकालपट्टी
अनेक पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत अपक्ष, तर काहींनी दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केले. २० उमेदवारांसह ५४ जणांना भाजपाने पक्षातून बडतर्फ केले आहे. मतदानाला काही तास शिल्लक असताना नाशिकमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. यात माजी महापौरांचाही समावेश आहे.
शंभरी पार करण्याचे लक्ष्य
भाजपाने नाशिक महापालिकेची सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी शंभरपेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यावेळी भाजपाने अधिकाधिक यश मिळवण्यासाठी अनेक दुसर्या पक्षातील स्थानिक नेत्यांना पक्षात घेतले आणि त्यांना तिकिटे दिली. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये तयारी करत असलेल्या भाजपातील पदाधिकाऱ्यांना डावलले गेले. त्याचे पडसाद बंडखोरीतून उमटली आहे.
भाजपाने कुणाची केली हकालपट्टी?
माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी सभागृह नेते शशिकांत जाधव, सतीश सोनवणे, कमलेश बोडके, माजी गटनेते दिलीप दातीर, अनिल मटाले, माजी नगरसेवक पूनम सोनवणे, मीरा हांडगे, सुनीता पिंगळे, अंबादास पगारे, अलका अहिरे, रुची कुंभारकर, मुकेश शहाणे, पंडित आवारे, दामोदर मानकर, कन्हय्या साळवे, वंदना मनचंदा, शीला भागवत, नंदिनी जाधव, बाळासाहेब पाटील, राजेश आढाव, जितेंद्र चोरडिया, सचिन मोरे, अमित घुगे, ज्ञानेश्वर काकड, ज्ञानेश्वर पिंगळे, चारुदत्त आहेर, तुषार जोशी, सचिन हांडगे, प्रकाश दीक्षित, रतन काळे, ऋषिकेश आहेर, ऋषिकेश डापसे, कैलास अहिरे, सतनाम राजपूत, गणेश मोरे, किरण गाडे, मंगेश मोरे, शाळीग्राम ठाकूर, कल्पेश ठाकूर, मनोज तांबे, शरद शिंदे, शरद इंगळे, प्रभा काठे, स्मिता बोडके, योगिता राऊत, बाळासाहेब घुगे, शंकर विधाते, प्रेम पाटील, रत्ना सातभाई, सविता गायकर, राहुल कोथमिरे, शीतल साळवे आणि एकनाथ नवले यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.
भाजपा-शिंदेसेना स्वबळावर
मुंबई, ठाणे महापालिका वगळता इतर ठिकाणी भाजपा आणि शिंदेसेनेची युती झालेली नाही. नाशिक महापालिकेतही भाजपा-शिंदेसेना स्वबळावर लढत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांनीही सर्वस्व पणाला लावले आहे.